हौशी अंतराळवीरांची तीन दिवसांची अंतराळ मोहीम यशस्वी | पुढारी

हौशी अंतराळवीरांची तीन दिवसांची अंतराळ मोहीम यशस्वी

वॉशिंग्टन : व्यावसायिक अंतराळवीर नसलेल्या चौघांनी एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीकडून तीन दिवसांचा अंतराळ प्रवास केला आणि आता हे चौघेही सुखरूपपणे पृथ्वीवर परत आले आहेत. फ्लोरिडाच्या किनार्‍याजवळ अटलांटिक महासागरात त्यांचे लँडिंग झाले. हे चौघेही ‘इन्स्पिरेशन-4’ या मोहिमेवर गेले होते आणि ही तीन दिवसांची मोहीम यशस्वी झाली.

‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन या कॅप्सूलमधून हे चौघेजण अंतराळ प्रवासासाठी गेले होते. आता हे कॅप्सूल चौघांना घेऊन पॅराशूटसह समुद्रात उतरले. त्यावेळी अमेरिकेत संध्याकाळ झाली होती. सूर्यास्ताच्या थोड्या वेळापूर्वी हे कॅप्सूल पृथ्वीवर उतरले. ते ज्या ठिकाणी उतरले तेथून थोड्याच अंतरावरून त्यांनी अंतराळात झेप घेतली होती.

कॅप्सूल समुद्रात उतरल्यावर ‘स्पेस एक्स’चे मिशन कंट्रोलर म्हणाले, ‘स्पेस एक्स’कडून पृथ्वीवर आपले स्वागत आहे. आपल्या मिशनने जगाला दाखवून दिले आहे की अंतराळ सर्वांसाठी खुले आहे! एलन मस्क यांनी या मोहिमेच्या माध्यमातून 200 दशलक्ष डॉलर्स गोळा करण्याचे लक्ष्य ठेवलेहोते.

हा निधी सेंट ज्यूड चिल्ड्रेन्स रिसर्च हॉस्पिटलला दिला जाणार आहे. मोहीम पूर्ण होईपर्यंत 160 दशलक्ष डॉलर्सचा निधी जमा झाला होता. एलन मस्क यांनी स्वतःकडून 50 दशलक्ष डॉलर्स दिले. या मोहिमेत जेयर्ड इसाकमन हे ‘पेमेंट’ कंपनीचे 38 वर्षांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ‘कमांडर’च्या भूमिकेत होते.

ते एक व्यावसायिक पायलटही आहेत. कर्करोगावर मात केलेल्या 29 वर्षीय हेयली आर्केनो, अ‍ॅरिझोना येथील महाविद्यालयातील प्राध्यापक शॉन प्रोक्टर आणि अमेरिकन हवाई दलाचे वैमानिक म्हणून सेवा बजावलेले 42 वर्षांचे ख्रिस सेम्ब-ोस्की हे या मोहिमेत सहभागी होते.

Back to top button