एक लाख वर्षांपूर्वीची हत्तींची ‘नर्सरी’! | पुढारी

एक लाख वर्षांपूर्वीची हत्तींची ‘नर्सरी’!

माद्रिद : संशोधकांनी नैऋत्य स्पेनमध्ये हिमयुगातील हत्तींच्या पिल्‍लांच्या पाऊलखुणा शोधून काढल्या आहेत. एक लाखापेक्षाही अधिक वर्षांपूर्वी ही पिल्‍ली तेथील चिखलात खेळत होती. एक डझनपेक्षा अधिक संख्या असलेल्या या पिल्‍लांमध्ये नवजात, बालक आणि किशोरवयीन पिल्‍लांचा समावेश होता. ही जणू काही  हत्तींची ‘नर्सरी’च होती असे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी याठिकाणी 34 पाऊलखुणा शोधल्या आहेत. या खुणा सरळ सुळे असलेल्या ‘पॅलिओलॉक्सोडोन अँटिकस’ या हत्तींच्या आहेत. सध्याच्या हत्तींचे हे एक नामशेष झालेले पूर्वज आहेत. हेल्वा येथील मॅटॅलास्कानस ट्रॅम्प्लेड सरफेस या नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी या पाऊलखुणा आढळल्या. 2.6 दशलक्ष ते 11,700 वर्षांपूर्वीच्या काळात या मार्गावरून हत्तींची नेहमी ये-जा होत असे. याच ठिकाणी कालांतराने निएंडरथल मनुष्याचाही वावर सुरू झाला.

तिथे प्रौढ आणि लहान वयाच्या निएंडरथल मानवाच्याही पाऊलखुणा सापडलेल्या आहेत. ते याठिकाणी हत्तींची शिकार करण्यासाठी आले असावेत असे संशोधकांना वाटते. या मार्गावरून विशेषतः तरुण हत्तींणींसोबत त्यांची पिल्‍ली जात असत. तेथील केवळ दोन पाऊलखुणा प्रौढ नर हत्तींच्या असाव्यात असे संशोधकांना वाटते.

Back to top button