Leukemia : ल्युकेमियावरील उपचाराची नवी पद्धत ब्रिटनमध्ये यशस्वी | पुढारी

Leukemia : ल्युकेमियावरील उपचाराची नवी पद्धत ब्रिटनमध्ये यशस्वी

लंडन : ब्रिटनमध्ये डॉक्टरांनी ल्युकेमिया (Leukemia) म्हणजेच रक्ताच्या कर्करोगावरील उपचाराची एक नवी पद्धत यशस्वी केली आहे. त्यांनी ल्युकेमियाग्रस्त असलेल्या तेरा वर्षांच्या एका मुलीवर यशस्वी उपचार करून तिला बरे केले आहे. त्यामुळे आता ही नवी थेरपी आशेचा एक किरण बनली आहे. भविष्यात या पद्धतीने ल्युकेमियावर जगभर उपचार सुरू होऊ शकतील.

या मुलीचे नाव अलाइशा असे आहे. 2021 पासून ही मुलगी टी-सेल ल्युकेमियाने (Leukemia) ग्रस्त होती. ज्या ब्लड कॅन्सरने ती पीडित होती त्यावर पारंपरिक उपचाराचा व अगदी किमोथेरपीचाही परिणाम होत नव्हता. बोन मॅरो ट्रान्सप्लँटही तिच्यावर प्रभावी ठरत नव्हता. लंडनच्या ‘ग्रेट ऑरमोन्ड स्ट्रीट हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन’ या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर नव्या पद्धतीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी अनुवंशिक धर्तीवर निर्मित रोगप्रतिकारक पेशींचा उपचारासाठी वापर केला. या पेशी एका निरोगी स्वयंसेवकाकडून घेण्यात आल्या होत्या. या मुलीवर सहा महिने या थेरेपीनुसार उपचार करण्यात आले.

थेरपी सुरू केल्यानंतर 28 दिवसांमध्येच तिचा कर्करोग (Leukemia) बरा होऊ लागला होता. त्यामुळे तिच्यावर दुसरा बोन मॅरो ट्रान्सप्लँट होऊ शकले जेणेकरून तिची रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा ठीक होईल. सहा महिन्यांनंतर आता ही मुलगी निरोगी असून लिसेस्टरमधील आपल्या घरी आराम करीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती नियमितपणे तपासणीसाठी जाते. तिच्या प्रकृतीवर आणखी काही महिने लक्ष ठेवावे लागेल व त्यानंतर या उपचाराच्या यशाची खर्‍या अर्थाने पुष्टी होईल असे हॉस्पिटलमधील सल्लागार रॉबर्ट चाइसा यांनी म्हटले आहे.

अ‍ॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा मुलांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा कर्करोगाचा (Leukemia) प्रकार आहे. या कर्करोगामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर विपरित परिणाम होतो. विशेषतः बी व टी सेल्स ज्या अशा धोकादायक आजारापासून वाचवत असतात, त्याच प्रभावित होऊ लागतात. हॉस्पिटलने म्हटले आहे की अलाइशा ही अशी पहिली रुग्ण होती जिला बेस-एडिटेड टी सेल्स देण्यात आल्या. या थेरपीचे नेतृत्व करणार्‍या इम्युनोलॉजिस्ट वसीम कासिम यांनी सांगितले की ही अतिशय अद्ययावत अशी ‘सेल इंजिनिअरिंग’ आहे. यामुळे आजारी मुलांच्या उपचारासाठी आशेचा एक नवा किरण दिसला आहे.

Back to top button