

मेलबर्न : पश्चिम ऑस्ट्रेलियाजवळ समुद्राच्या खोल तळाशी सापडलेल्या ४०० वर्षे जुन्या जहाजाच्या अवशेषांमधून संशोधकांच्या हाती अत्यंत थक्क करणारी माहिती लागली आहे. हे डच ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज होते, जे १६२९ मध्ये आपल्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाले होते. खजिन्याने भरलेल्या या जहाजाच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या वस्तूंचा अभ्यास करून संशोधकांनी त्या वस्तू मूळ कुठल्या होत्या, या रहस्याचा शोध लावला आहे.
या अभ्यासाचे मुख्य लेखक अँथनी क्लार्क आणि त्यांच्या टीमने ‘डिजिटल जिरकॉन U-Pb फिंगरप्रिंटिंग’ नावाच्या अत्याधुनिक जिओकेमिकल तंत्रज्ञानाचा वापर करून या वस्तूंच्या मूळ ठिकाणाचा शोध घेतला. अभ्यासासाठी जहाजातील दगडांचे ठोकळे, विटा आणि बॅलास्ट (जहाजाचा समतोल राखण्यासाठी वापरले जाणारे दगड) यांचे विश्लेषण करण्यात आले. पूर्वी मानले जात होते की, या वस्तू एकाच ठिकाणाहून आणल्या गेल्या होत्या. मात्र अभ्यासातून असे समोर आले आहे की, या वस्तू युरोपमधील विविध खाणींमधून आणल्या गेल्या होत्या.
याच आठवड्यात बुधवारी युनिव्हर्सिटीच्या मीडिया रिलिजमध्ये क्लार्क यांच्या हवाल्याने म्हटले गेले की, ऐतिहासिक नोंदी अपुऱ्या आहेत आणि पाण्याखाली सुमारे ४०० वर्षे राहिल्यामुळे हे दगड एकसारखे दिसू शकतात, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण होते. डच ईस्ट इंडिया कंपनी आपल्या जागतिक नेटवर्कमध्ये सामान कोठून आणत असे आणि ते कसे पोहोचवत असे, हे शोधणे या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट होते. संशोधकांना असे आढळून आले की हे दगड जर्मनीतील ‘लोअर सॅक्सनी बेसिन’मधील बेंटहाईम आणि ओबरनकिर्चेन या खाणींमधून आणले गेले होते.
अँथनी क्लार्क यांनी सांगितले की, आम्हाला आढळले की, हे दगड कमीत कमी दोन वेगवेगळ्या खाण क्षेत्रांतून आणले गेले होते. त्यानंतर एकाच शिपमेंटमध्ये गोळा करून ४०० वर्षांपूर्वी एका अत्यंत सुव्यवस्थित पुरवठा साखळीद्वारे (सप्लाय चेन) जगाच्या दुसऱ्या टोकाला पाठवले गेले होते. ऐतिहासिक स्रोतांनुसार ‘बटाव्हिया’ नावाचे हे जहाज ऑक्टोबर १६२८ मध्ये ३४१ लोकांसह नेदरलँडस्हून डच ईस्ट इंडीजची राजधानी बटाव्हिया (सध्याचे जकार्ता) कडे निघाले होते. या जहाजावर चांदीच्या लाद्या, व्यापारी सामान आणि बांधकाम साहित्य लादलेले होते. मात्र, प्रवासादरम्यान जहाजावर बंड झाले आणि ते रस्ता भरकटले. जून १६२९ मध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियाजवळील ‘अब्रोलहोस बेटां’जवळ हे जहाज अपघातग्रस्त झाले. त्यानंतर १९६३ मध्ये या जहाजाचे अवशेष पहिल्यांदा शोधून काढण्यात आले होते.