Gold factory : अंतराळात दिसली ‘सोन्याची फॅक्टरी’! | पुढारी

Gold factory : अंतराळात दिसली ‘सोन्याची फॅक्टरी’!

न्यूयॉर्क : पृथ्वीच्या पोटात सोन्याची निर्मिती (Gold factory) होत असते व खाणीतून सोने बाहेर काढले जाते, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, अंतराळाच्या विशाल पोकळीतही सोन्याची निर्मिती होते याची आपल्याला माहिती आहे का? खगोलशास्त्रज्ञांनी आता अशीच ‘सोन्याची फॅक्टरी’ शोधून काढली आहे. वास्तवात, त्यांनी एका कृष्णविवराला धडकणार्‍या न्यूट्रॉन तार्‍यांचा शोध लावला आहे. अशा धडकेतून गामा किरणांचा जोरदार स्फोट होतो व त्यामधून सोने व प्लॅटिनमसारखे मौल्यवान घटक निर्माण होतात.

गामा किरणांच्या या विस्फोटाला एका स्पेस टेलिस्कोपने आणि ‘नासा’च्या एका ऑब्झर्व्हेटरीने पाहिले आहे. लिसेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा विस्फोट म्हणजे एक दुर्लभ ब्रह्मांडीय घटना असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट काही मिनिटांचा होता. याबाबतचे संशोधन भविष्यातील अशा घटनांचे अध्ययन करण्यासाठी सहायक होईल. गामा किरणांचा विस्फोट (Gold factory) हा ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली स्फोटांपैकी एक असतो. जवळच्याच एका आकाशगंगेत असा विस्फोट झाल्याचा छडा डिसेंबर 2021 मध्ये लागला होता.

वैज्ञानिकांनी या स्फोटाला (Gold factory) ‘जीआरबी 211211ए’ असे नाव दिले होते. हा स्फोट अपेक्षेपेक्षा अधिक दीर्घ होता व त्याच्यापासून अपेक्षेपेक्षाही अधिक इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित झाला. संशोधनानंतर असे समजले की, प्रकाश एका किलोनोवामधून आला होता. ‘किलोनोवा’ ही तार्‍यांशी संबंधित एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये न्यूट्रॉन तारे आणि कृष्णविवरांची धडक होते. अशा विस्फोटातून सोने व प्लॅटिनमसारखे घटक निर्माण होतात. बर्मिंघम युनिव्हर्सिटीतील संशोधक डॉ. मॅट निकोल यांनी सांगितले की, ‘किलोनोवा’ हे ब्रह्मांडातील सोन्याचे मुख्य कारखाने आहेत.

हेही वाचा : 

Back to top button