आदिमानवाच्या ‘पोशाखा’साठीच्या अवजारांचा शोध | पुढारी

आदिमानवाच्या ‘पोशाखा’साठीच्या अवजारांचा शोध

न्यूयॉर्क : गुहांमध्ये राहणारे आपले पूर्वज देहरक्षणासाठी काय परिधान करीत होते, त्यांचे पोशाख कसे बनवले जात असत याबाबतचे पुरावे अतिशय दुर्मीळ आहेत. फर, कातडे आणि अन्य कार्बनिक पदार्थ काळाच्या ओघात सुरक्षित राहू शकत नाहीत. विशेषतः एक लाख वर्षांपूर्वीच्या अशा वस्तू सुरक्षित राहणे केवळ अशक्य आहे. आता संशोधकांनी म्हटले आहे की त्यांना मोरोक्कोमधील एका गुहेत हाडांपासून बनवलेली 62 अवजारे सापडली आहेत. त्यांचा वापर जनावरांचे कातडे काढणे व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी होत असे. त्यावरून आदिमानवाच्या पोशाख बनवण्याच्या कलेवर नवा प्रकाश पडू शकतो.

ही अवजारे 90 हजार ते 1 लाख 20 हजार वर्षांपूर्वीची आहेत. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर द सायन्स ऑफ ह्युमन हिस्टरीच्या पॅन आफ्रिकन इव्होल्युशन रिसर्च ग्रुपमधील एमिली यूको हॅलेट यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या शोधाची आम्ही अपेक्षा केली नव्हती. आम्ही प्राचीन मानवाच्या आहाराची माहिती घेण्यासाठी अशा ठिकाणी प्राण्यांच्या हाडांचा शोध घेत होतो. आम्हाला याठिकाणी देहावर परिधान करण्यासाठी कातडे काढण्याच्या व ते कमावण्याच्या अवजारांचा शोध लागला.

याठिकाणी बारा हजार प्राण्यांची हाडे होती. त्यांचा आकार अतिशय वेगळा होता व त्यामुळे त्यांचा वापर कसा केला जात असावा याकडे आमचे लक्ष वेधले. त्यांची रचना नैसर्गिक नव्हती व या हाडांचे रूपांतर अवजारांमध्ये केले गेले आहे हे दिसून येत होते. ही हाडे चमकदार होती आणि त्यांच्यावर रेषा होत्या. एखाद्या प्राण्याला मारून खाल्ल्यानंतर टाकलेल्या हाडांपेक्षा ही हाडे वेगळी होती. गुहेत राहणारे लोक फर मिळवण्यासाठी कोल्हा, जंगली मांजरं व तत्सम प्राणी मारून त्यांचे कातडे काढत असावेत.

Back to top button