सहा महिन्यांनंतर चीनचे तीन अंतराळवीर पृथ्वीवर | पुढारी

सहा महिन्यांनंतर चीनचे तीन अंतराळवीर पृथ्वीवर

बीजिंग : कायमस्वरूपी अंतराळ स्थानक बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील चीनचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तियांगोंग स्टेशन चीनसाठी मोठे यश मानले जात आहे. या वर्षाच्या अखेरीस तियांगोंगचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीन स्वतःचे अंतराळ स्थानक असणारा जगातील पहिला देश बनेल. आता सहा महिन्यांनंतर चीनचे तीन अंतराळवीर या स्थानकावरून मोहीम यशस्वी करून पृथ्वीवर सुखरूपरीत्या परतले आहेत. 5 जून रोजी ‘शेनझोऊ-14’ यान चेन डोंग, लिऊ यांग आणि काई शुझे यांना घेऊन अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. तेथे तिघांनी 183 दिवस स्पेस स्टेशनमध्ये राहून अनेक संशोधन व स्थानक उभारणीचे काम केले.

चीन आणि अमेरिका यांच्यातील सर्वात शक्तिशाली बनण्याची स्पर्धा केवळ लष्कर आणि आधुनिक शस्त्रास्त्रांपुरती मर्यादित नाही. हे दोन देश अवकाशातही एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. चीनने आपल्या अंतराळ स्थानकाचे काम 2022 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे स्थानक पूर्ण झाल्यास, अंतराळ स्थानक असणारा चीन हा जगातील एकमेव देश असेल.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा अनेक देशांचा सहयोगी प्रकल्प आहे. चायना स्पेस स्टेशन हे आता त्याला ‘टक्कर’ देत आहे. तिथे नुकतेच तीन अंतराळवीरांचा नवा क्रू रवाना झाला असून त्यांच्याकडे तेथील जबाबदारी सुपूर्द करून हे तिघे परतले आहेत. या स्थानकाचे आयुष्य 15 वर्षांचे गृहित धरण्यात आले आहे. या स्थानकाला ‘तियांगोंग’ असे नाव देण्यात आले आहे. चीनच्या भाषेत त्याचा अर्थ ‘स्वर्गाचा महाल’ असा आहे.

Back to top button