सोन्याचा कमोड : 40 हजारांपेक्षाही अधिक हिरे जडवलेले कमोड! | पुढारी

सोन्याचा कमोड : 40 हजारांपेक्षाही अधिक हिरे जडवलेले कमोड!

हाँगकाँग : हल्ली सोने व हिरे जडवलेल्या अनेक भन्नाट वस्तू समोर येत आहेत. त्यामध्ये मोटार, सँडल्स, पर्स यांच्यापासून ते चक्क कमोडपर्यंतच्या वस्तूंचा समावेश होतो. व्हिएतनाममधील तर एक अख्खे हॉटेलच सोन्याने मढवलेले आहे. हाँगकाँगच्या ‘कोरोनेट’ या ज्वेलरी ब्रँडने चक्क सोन्याचे कमोड बनवले आहे. त्यावर 40 हजारांपेक्षाही अधिक हिरे जडवलेले आहेत. या कमोडमध्ये बुलेटप्रूफ ग्लासची सीट लावलेली आहे.

‘कोरोनेट’चे मालक अरोन शुम यांच्या म्हणण्यानुसार या मौल्यवान कमोडची किंमत 12,88,677 डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 कोटी 22 लाख रुपये आहे. या कमोडच्या सीटवर 40,815 हिरे जडवलेले असून ते एकूण 334.68 कॅरेटचे आहेत. सीटवरील बुलेटप्रूफ काचेत हे हिरे जडवलेले आहेत. अर्थात हे कमोड कितीही महागडे आणि सोन्या-हिर्‍याचे असले तरी त्याचा वापर ‘तस्साच’! मात्र हे कमोड विकण्याची आपली इच्छा नाही आणि ते खरेदीसाठी कुणीही पुढे आलेले नाही, असेही शुम यांनी म्हटले आहे.

या कमोडची गिनिज बुकमध्ये नोंद व्हावी अशी मात्र त्यांची इच्छा आहे. तसे घडले तर त्यांचा हा दहावा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. यापूर्वीही त्यांच्या अनेक ज्वेलरी पीसना गिनिजमध्ये स्थान मिळालेले आहे. यापूर्वी त्यांनी एक गिटार बनवले होते जे 400 कॅरेटच्या हिर्‍यांनी सजले होते. त्याची किंमत आहे 14 कोटी रुपये. त्यांनी बनवलेल्या एका उंच टाचेच्या सँडलमध्ये दहा हजार गुलाबी हिरे जडवले होते. या सँडलची किंमत आहे 30 कोटी रुपये.

Back to top button