amnesia : स्मृतिभ्रंशावर औषध शोधण्यास अखेर मिळाले यश | पुढारी

amnesia : स्मृतिभ्रंशावर औषध शोधण्यास अखेर मिळाले यश

लंडन : उतारवयात होणार्‍या मेंदूच्या आजारांमध्ये डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश (amnesia) या आजाराचा समावेश होतो. या आजारात माणसाची स्मरणशक्ती कमजोर होत असते. मेंदूच्या अनेक विकारांप्रमाणेच या विकारावरही औषध नाही असेच वाटत होते; पण आता संशोधकांना यावर प्रभावी औषध शोधण्यास यश मिळाले आहे. ‘लेकेनेमॅब’ असे या औषधाचे नाव असून, त्यामुळे हा आजार बरा होणार आहे.

स्मृतिभ्रंशग्रस्त  (amnesia) नागरिकांच्या मेंदूमध्ये एक प्रकारचा चिकट द्रव म्हणजेच ‘बीटा अ‍ॅमिलॉईड’ तयार होत असते. यावर ‘लेकेनेमॅब’ हे औषध हल्ला करते. ते मेंदूतील ‘अ‍ॅमिलाईड’ काढून टाकण्याच्या द़ृष्टिकोनातून बनवण्यात आलेले आहे. अ‍ॅमिलाईड हे प्रथिनांचा एक प्रकार असून, ते मेंदूतील ‘न्यूरॉन्स’मधील म्हणजेच चेतापेशींमधील मोकळय़ा जागेत जमा होते. हे एक स्मृतिभ्रंशचे लक्षण आहे.

निरोगी मेंदूपेक्षा स्मृतिभ्रंशचा आजार झालेल्या व्यक्तीच्या मेंदूंमध्ये ‘अ‍ॅमिलाईड’ हे मोठ्य़ा प्रमाणात असते. ‘लेकेनेमॅब’ हे ‘अ‍ॅमिलाईड’वर हल्ला करणार्‍या रोगप्रतिकारक पेशी तयार करून ते नष्ट करत असल्याचे संशोधनातून दिसून आले. या संशोधनामध्ये 1 हजार 795 स्मृतिभ्रंशग्रस्तांवर  (amnesia) पहिल्या टप्प्यात चाचण्या करण्यात आल्या. दर 15 दिवसांनी त्यांना ‘लेकेनेमॅब’ हे औषध दिले जात होते.

स्मृतिभ्रंशसंदर्भातील ‘लेकेनेमॅब’चे निष्कर्ष हे उल्लेखनीय असल्याचे ब्रिटनमधील संशोधकांकडून सांगण्यात आले. या संशोधनात सहभागी झालेल्यांपैकी 17 टक्के नागरिकांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, 13 टक्के नागरिकांच्या मेंदूला सूज आल्याचे मेंदूचे ‘स्कॅन’ केल्यानंतर दिसून आले. तर सात टक्के लोकांना झालेल्या दुष्परिणामामुळे औषध बंद करावे लागले.‘लेकेनेमॅब’ या औषधाचा स्मृतिभ्रंश  (amnesia) रुग्णांवर फारच थोडा परिणाम दिसून आला असला तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्याच्या द़ृष्टिकोनातून हा परिणाम फार महत्त्वपूर्ण असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात येते.

सॅन फ्रान्सिस्कोमधील अल्झायमर रोग परिषदेत वैद्यकीय चाचण्यांचे सादर केलेले आणि न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या औषधानंतरही नागरिकांच्या मेंदूची शक्ती क्षीण होण्याचे प्रमाण कायम असले तरी 18 महिन्यांच्या काळात हे प्रमाण एक चतुर्थांशने कमी झाल्याचे दिसून आले आहे. ‘लेकेनेमॅब’ हे वापरासाठी योग्य आहे का? या संदर्भातील माहितीचे अमेरिकेतील नियामकांद्वारे मूल्यमापन करण्यात येत आहे. दरम्यान, आता फक्त हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध उपलब्ध आहे. सध्या जगामध्ये 55 दशलक्ष नागरिक स्मृतिभ्रंश  (amnesia) या आजाराने त्रस्त आहेत. 2050 मध्ये ही संख्या 139 दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे.

संशोधकांना काय वाटते?

30 वर्षांपासून संशोधन करणार्‍या प्रो. जॉन हार्डी यांनी हे संशोधन ऐतिहासिक आहे, असे सांगितले. एडीनबर्ग विद्यापीठाचे प्रो. तारा स्पायर्स जोन्स यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. भविष्यात अधिक चांगली औषधे निर्माण होण्यास मदत होईल, असे अल्झायमर रिसर्चर डॉ. सुसान कोहलहास यांनी सांगितले.

Back to top button