शेतात सापडली चौदाव्या शतकातील अंगठी | पुढारी

शेतात सापडली चौदाव्या शतकातील अंगठी

लंडन : कुणाचे भाग्य कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. ब्रिटनमध्ये एका निवृत्त ट्रक ड्रायव्हरबाबतही असेच घडले. या माणसाला शेतातील जमिनीत एक अंगठी मिळाली जी इतिहासातील एका प्रसिद्ध व्यक्तीची निघाली! या अंगठीच्या विक्रीतून त्याला तब्बल 37 लाख रुपये मिळाले.

69 वर्षांच्या डेव्हीड बोर्ड यांना ही ऐतिहासिक अंगठी सापडली. त्यांना आधी वाटले की त्यांच्या हाताला एक स्वीट रॅपर लागला आहे. मात्र, ती सोने आणि हिर्‍याची एक जुनी अंगठी होती. ही अंगठी त्यांना डोर्सेटमध्ये बोलिंग ग्रीन फार्महाऊसवर सापडली. चौदाव्या शतकात सर थॉमस ब्रूक या अंगठीचे मालक होते. डेव्हीड यांनी सांगितले की ही अंगठी जमिनीत 5 इंच खोलीवर दबलेली होती. ती ज्या सर थॉमस यांच्या मालकीची होती ते सोमरसेटमधील सर्वात मोठे जमीनदार होते. ते तेरा वेळा संसदेचे सदस्य बनले होते.

त्यांनी एक श्रीमंत विधवा लेडी जोन ब्रूक यांच्याशी सन 1388 मध्ये विवाह केला होता. या अंगठीवर फ्रेंच भाषेत ‘मी तुझा विश्वास जतन केला आहे, तूही तसेच कर!’ असे लिहिलेले आहे. ही एक वेडिंग रिंग असून ती सर थॉमस यांनी लेडी जोन ब्रूक यांना दिली होती. ही अंगठी अद्यापही सुस्थितीत असून तिच्यामध्ये इनव्हर्टेड डायमंड बसवलेला आहे. या अंगठीचा लिलाव करण्यात आला आणि त्यामधून मिळालेली रक्कम डेव्हिड आपल्या एका मित्राबरोबरही ‘शेअर’ करणार आहेत.

Back to top button