बीजिंग : चीन आपल्या अंतराळ स्थानकावर मंगळवारी तीन अंतराळवीर पाठवणार आहे. चीनचे हे 'तियानगोंग-1' नावाचे अंतराळ स्थानक आता जवळजवळ पूर्ण झाले आहे. मंगळवारी चीनच्या 'शेंझू-15' या यानातून तीन अंतराळवीर तिकडे रवाना होतील. वायव्य चीनमधील जियुकुआन सॅटेलाईट लाँच सेंटरवरून हे यान प्रक्षेपित केले जाईल. या स्थानकावर यापूर्वीपासूनच अंतराळवीर मुक्काम ठोकून विविध प्रयोग करीत आलेले आहेत.
चीनचे फेई जुनियोंग, डेंग किंगमिंग आणि झांग लू हे तीन अंतराळवीर मंगळवारी अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. 'सीएमएसए' या स्पेस एजन्सीने याबाबतची माहिती दिली आहे. फेई हे या मोहिमेचे कमांडर असतील असेही सांगण्यात आले. लवकरच आपले अंतराळवीर चांद्रभूमीवरही जातील असेही चीनच्या या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नेही चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू केली असून त्याचा पहिला टप्पा 'आर्टेमिस-1'ने सुरू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीननेही ही घोषणा केली आहे. आता जे अंतराळवीर स्थानकावर जाणार आहेत ते सहा महिने तिथे राहून स्थानकाचे उर्वरित काम पूर्ण करतील.