एका ट्विटमुळे फळफळले हॅकरचे नशीब! | पुढारी

एका ट्विटमुळे फळफळले हॅकरचे नशीब!

वॉशिंग्टन : कुणाचे भाग्य कधी व कसे उघडेल हे काही सांगता येत नाही. आता एका हॅकरचे भाग्यही असेच एका ट्विटमुळे फळफळले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यापासून उद्योगपती एलन मस्क दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता फक्त एका ट्विटमुळे एका तरुणाला नोकरी देण्याचे काम मस्क यांनी केले आहे. त्यांनी अ‍ॅपलच्या एका हॅकरची ट्विटरवरून नियुक्ती केली आहे. या तरुणाने मस्क यांना ट्विट करून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर मस्क यांनी त्याला रिप्लाय दिला आणि कंपनीत नोकरीही दिली.

मस्क यांनी जॉर्ज हॉज या माजी आयफोन हॅकरला नोकरीवर घेतले आहे. ट्विटरच्या सर्च संदर्भात येणार्‍या समस्या सोडवणे हे त्याचे काम असेल. हॉजने एका ट्विटद्वारे आपले जॉयनिंग कन्फर्म केले आहे. त्यानंतर ट्विटरवरून नोकरी मिळाल्याबद्दल काही यूजर्सनी आश्चर्य व्यक्त केलंय. “एलन मस्क यांनी मला माझं काम सांगितलं आहे आणि मी ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन. माझ्याकडे 12 आठवड्यांचा वेळ आहे,” असे हॉजने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हॉजने काही दिवसांपूर्वीच एक ट्विट करून एलन मस्क हे पाषाणहृदयी असल्याचे म्हटले होते. तसेच “त्यांच्या अशा अ‍ॅटिट्यूडमुळेच सर्वोत्कृष्ट गोष्टी आकाराला येतात. ज्यांना काही विशाल करण्याची महत्त्वाकांक्षा नाही, त्यांनी अशांपासून (व्यक्तींपासून) दूर राहावं,” असे हॉजने ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर त्याने मस्कना आपण सेवा देण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या
Back to top button