जास्त झोपणेही ठरू शकते हानिकारक | पुढारी

जास्त झोपणेही ठरू शकते हानिकारक

नवी दिल्ली : ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे सर्वच बाबतीत महत्त्वाचे आहे. झोप ही आरोग्यासाठी नितांत आवश्यक बाब आहे. आठ तासांची गाढ झोप तन-मनाच्या विश्रांती व आरोग्यासाठी गरजेची आहे. मात्र, जास्त झोपणेही हानिकारक ठरू शकते.

जास्त झोप येणे हा देखील एकप्रकारचा आजार असून याला ‘हायपरसोमनिया’ असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीला दिवसाही खूप झोप येते. अशी व्यक्ती कोणतेही कारण देऊन सतत झोपण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, हे शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि व्यक्ती शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या कमकुवत होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये वेळ घालवल्याने या आजाराचा धोका अधिक वाढतो. मोबाईलमधून निघणारी निळी किरणे झोपेवर प्रभाव पाडतात. तसेच रात्री झोपताना मद्यपान, धूम्रपान किंवा कॉफीचे सेवन केल्याने झोप येत नाही. तथापि, काही लोकांना कधीही झोप येते. हे हायपरसोमनिया या आजारामुळे होऊ शकते.

क्लीव्हलँड क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हायपरसोमनिया हा आजार होण्याचे प्रमाण सामान्य आहे. असेही मानले जाते की एकूण लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांवर याचा प्रभाव होतो. तसेच सहसा किशोरवयीन मुले आणि तरुणांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त झोपल्याने नैराश्य येते. तसेच यामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन हार्मोनचे स्तर कमी होतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जे लोक जास्त झोपतात त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. इतकेच नाही तर याचा आपल्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.

Back to top button