काय सांगता… एक किलो चहाची किंमत 9 कोटी रुपये | पुढारी

काय सांगता... एक किलो चहाची किंमत 9 कोटी रुपये

बीजिंग : प्रसन्न सकाळ आणि वाफाळलेला चहा हे समीकरण नेहमीच अवर्णनीय आनंद देणारे असते. बाजारात अनेकविध कंपन्यांचे चहाचे ब्रँड पाहायला मिळतात. मात्र, जगातील सर्वात महागड्या चहाच्या किमती ऐकून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल. चला तर जाणून घेऊया या महागड्या चहाविषयी.

दा हाँग पाओ टी : हा जगातील सर्वात महागडा चहा आहे. त्याची लागवड चीनच्या फुजियान प्रांतातील डोंगरमाळावर केली जाते. हा चहा दुर्मीळ असल्याने तो राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात आला आहे. एक किलो चहासाठी भारतीय चलनात तब्बल 9 कोटी रुपये मोजावे लागतात.

पांडा डुंग टी : चीनमधील चहाचा हा दुसरा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. पांडाच्या शेणापासून जे खत तयार होते, ते या चहाच्या मळ्यात वापरण्यात येते. या एक किलो चहाची किंमत आहे 57 लाख रुपये.

यलो गोल्डन टी बडस् : जगातील तिसरा महागडा चहा सिंगापूरचा आहे. याचे पान सोनेरी रंगाचे असते. वर्षांतून एकदाच या दुर्मीळ चहाचे पीक घेण्यात येते. या सोनेरी चहासाठी प्रतिकिलो खर्च आहे 6 लाख रुपये. सिल्व्हर टिप्स इम्पेरियल टी ः हा चहा आपल्या भारतात तयार केला जातो आणि तो जगातील चौथा सर्वात महागडा चहा आहे. या चहाची पाने केवळ पौर्णिमेच्या रात्रीच तोडण्यात येतात. दार्जिलिंगच्या मळ्यात याचे उत्पादन घेण्यात येते. एक किलो चहासाठी तुम्हाला मोजावे लागतात दीड लाख रुपये.

जियोकुरो : महागड्या चहाच्या यादीतील पाचवा क्रमांक लागतो जपानमधील जियोकुरोचा. जपानमधील उजी जिल्ह्यात याची लागवड केली जाते. या एक किलो चहासाठी 52,960 रुपये खर्च करावे लागतात.

Back to top button