तुतानखामेनच्या मकबर्‍याशेजारी आढळला पिरॅमिड | पुढारी

तुतानखामेनच्या मकबर्‍याशेजारी आढळला पिरॅमिड

कैरो : इजिप्तमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी तुतानखामेनच्या प्रसिद्ध मकबर्‍याशेजारी केलेल्या उत्खननात एका राणीचा पिरॅमिड व शेकडो ममी शोधून काढल्या आहेत. ही इजिप्शियन प्राचीन राणी अद्याप अज्ञातच होती. याठिकाणी एकमेकांना जोडलेल्या अनेक भुयारांचे जाळेच आढळले आहे. तसेच अनेक कलाकृती, दागिनेही सापडले आहेत.

कैरोच्या दक्षिणेस 32 किलोमीटरवर असलेल्या गिझा येथील सकारा या आर्कियोलॉजिकल साईटवर गेल्या दोन वर्षांपासून उत्खनन सुरू होते. नुकतेच या ठिकाणी शेकडो सुंदर शवपेट्या आणि ममी सापडल्या. या ममी राजा तुतानखामेनच्या जवळच्या सल्लागार व सरदारांच्या असाव्यात असे मानले जात आहे. इसवी सनपूर्व 1333 ते इसवी सनपूर्व 1323 पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत हा राजा सत्तेवर होता.

ऐन तारुण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मकबर्‍यातून अनेक सोन्या-चांदीच्या वस्तू सापडल्या होत्या. पुरातत्त्व संशोधकांनी इजिप्तच्या सहाव्या साम्राज्यातील पहिला राजा टेटी याच्या जवळपासच असलेल्या पिरॅमिडकडेही लक्ष पुरवले आहे. नव्या साम्राज्याच्या काळात टेटीची देवासारखी पूजा केली जात असे. त्यामुळे त्याच्याजवळच आपले दफन व्हावे असे प्राचीन काळातील लोकांची इच्छा असे.

नीथ नावाच्या एका राणीचा मकबराही या उत्खननात आढळून आला आहे. या ठिकाणी ज्या शवपेट्या सापडल्या आहेत, त्यापैकी प्रत्येक शवपेटीचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट आहे. त्यावरील चेहराही वेगवेगळा असून स्त्री व पुरुषांचा भेदही यामधून दिसून येतो. प्रत्येक शवपेटीवर मृत व्यक्तीचे नाव तसेच प्राचीन इजिप्तमधील मृत्यू जीवनावर आधारित असलेल्या ग्रंथाशी संबंधित चित्रे कोरलेली आहेत.

Back to top button