बीट, गाजरामुळे लाल बनले मशरुम | पुढारी

बीट, गाजरामुळे लाल बनले मशरुम

बेतिया : आतापर्यंत आपण सफेद मशरुम पाहत आलो आहोत; पण आता त्यांना रंगीतही बनवले जात आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण्यातील बेगुसरायमध्ये नववीत शिकत असलेले दोन विद्यार्थी होदयप्पा शकील व सफी अख्तर यांनी याबाबतचा एक यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी मशरुमच्या विकासासाठी पाण्याऐवजी बिटरुट व गाजराच्या रसाचा वापर केला. त्यामुळे त्यांचा रंग लालसर तर झालाच, शिवाय त्यांचे पोषणमूल्यही वाढले.

हा प्रयोग अद्याप प्राथमिक स्तरावर असून तो गेल्या पाच महिन्यांपासून केला जात आहे. त्यासाठी शिक्षकांद्वारे स्थापित जिल्हा बाल विज्ञान काँग्रेसशी निगडीत संस्था भाभा सायन्स क्लबचा सहयोग मिळाला आहे. या प्रयोगाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे. 9 ते 11 डिसेंबरदरम्यान पाटण्याच्या तारामंडल परिसरातील कार्यक्रमात या आळिंबी सादर केल्या जातील.

तिथे निवड झाल्यास पुढील वर्षी 27 ते 31 जानेवारीदरम्यान हैदराबादमध्ये होणार्‍या प्रदर्शनात हे मशरुम सादर केले जातील. या प्रयोगात मार्गदर्शन करणार्‍या डॉ. रहमत यास्मिन यांनी सांगितले की, हे मशरुम उगवण्यासाठी भुशाच्या पॅकेटमध्ये बीट, गाजर किंवा हळदीचा रस टाकला जातो. त्यामुळे पुरेशी आर्द्रता निर्माण होते. त्यानंतर ज्यावेळी हे मशरुम उगवू लागतात त्यावेळीही त्यांच्यावर याच रसांचा शिडकावा केला जातो. मशरुम रसांमधील नैसर्गिक रंगांना शोषून घेतात आणि त्यांच्यामध्ये रंग विकसित होऊ लागतात.

Back to top button