तीन इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले 1 कोटी! | पुढारी

तीन इंच उंची वाढवण्यासाठी खर्च केले 1 कोटी!

लंडन : आपण उंच दिसावे अशी प्रत्येक तरुण-तरुणीची इच्छा असते. त्यासाठी मग अधिक उंचीच्या वहानाही वापरल्या जातात. उंच टाचेचे सँडल्स वापरणार्‍या तरुणींची संख्याही अधिक आहे; मात्र एखाद्या वृद्ध व्यक्तीला उतारवयात उंच दिसावे अशी इच्छा होणे ही एक दुर्मीळच बाब म्हणावी लागेल. त्यापेक्षाही दुर्मीळ बाब म्हणजे या खटाटोपात संबंधित माणसाने एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करणे! रॉय कॉन नावाच्या 68 वर्षे वयाच्या एका पाश्चात्त्य माणसाने इतका खर्च करून आपली उंची तीन इंचांनी वाढवली आहे.

या माणसाची उंची 5 फूट 6 इंच होती. आता ती 5 फूट 9 इंच झाली आहे. ज्यावेळी रॉय यांना विचारण्यात आले, की या वयात सर्जरी करून उंची वाढवण्याचे कारण काय? त्यावर त्यांनी सांगितले की, वय ही काही माझी समस्या नव्हती. माझ्या लहानपणी किंवा तरुणपणी अशा शस्त्रक्रियांची संधी उपलब्ध नव्हती. आता ती उपलब्ध आहे आणि मला माझ्या आयुष्यात आताच फुरसतीचा वेळ मिळाला असल्याने मी अशी शस्त्रक्रिया करवून घेतली.

माझ्याऐवजी माझ्या पत्नीलाच या शस्त्रक्रियेची अधिक चिंता वाटत होती. ती मला आहे त्या उंचीतच पसंद करीत असल्याने या शस्त्रक्रियेची गरज नाही, असेच तिचेही म्हणणे होते; मात्र मी अशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले व हा अनुभव बराच वेदनादायकही होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ. केव्हिन यांनी सांगितले की, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे दीड तासाचा वेळ लागला. यामध्ये रुग्णाला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. त्यामध्ये एका दिवसात सुमारे एक मिलिमीटर उंची वाढते. या प्रक्रियेदरम्यान आपल्याला एका इंचासाठी 25 दिवस आणि तीन इंचांसाठी सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. रॉय यांनी या शस्त्रक्रियेसाठी एकूण 1.2 कोटी रुपये खर्च केले.

Back to top button