तारुण्यातच समजू शकेल वृद्धावस्थेतील आजारांचा धोका | पुढारी

तारुण्यातच समजू शकेल वृद्धावस्थेतील आजारांचा धोका

लंडन : ‘जन्ममृत्यूजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम्’ असे गीतेत म्हटले आहे. प्रत्येक जीवाला जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू हे दोष चिकटलेले असतातच. वृद्धावस्था म्हटलं की अनेकांना मधुमेह, हृदयविकार, कमजोर हाडे आणि अल्झायमरसारखे विस्मरणाचे आजार आठवतात. उतारवयात या आजारांचा सामना करण्याआधीच जर त्यांचे भाकीत करता आले तर माणसाला याबाबत सावधगिरी बाळगता येऊ शकते. आता एका नव्या संशोधनानुसार उतारवयात होणार्‍या अशा भावी आजारांची तरुण वयातच भविष्यवाणी करता येऊ शकते.

रक्तामध्ये एक नवे इन्सुलिनसारखे हार्मोन आढळले आहे. त्याला ‘इन्सुलिन लाइक पेप्टाइड3’ (आयएनएसएल3) असे म्हटले जाते, जे भविष्यातील आजारांचे भाकीत करू शकते. एखाद्या व्यक्तीमध्ये वयाशी संबंधित आजार उत्पन्न होऊ शकतात का हे पाहता येऊ शकते. विशेषतः हे पुरुषांबाबत शक्य आहे. या संशोधनासाठी वृद्ध पुरुषांच्या सर्वात मोठ्या समूहांपैकी एक ‘युरोपियन मेल एजिंग स्टडी’च्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये इंग्लंडसह युरोपमधील 40 आणि 79 वर्षांच्या वयोगटातील 3,369 पुरुषांची निवड करण्यात आली व चार-पाच वर्षे त्यांची पाहणी झाली.

पुरुषांमधील वयाशी संबंधित आजारांचा टेस्टोस्टेरॉनसारख्या अनाबोलिक हार्मोनच्या कमतरतेशी संबंध जोडला जाऊ शकतो का हेसुद्धा यामधून पाहिले गेले. हे पुरुष हार्मोन शरीराची वृद्धी आणि विकासासाठीही महत्त्वाचे आहे. युरोपियन मेल एजिंग स्टडीच्या डेटाचा उपयोग करीतच संग्रहित रक्ताच्या नमुन्यांमध्ये ‘आयएनएसएल3’च्या स्तरांमधील महत्त्वपूर्ण संबंधांचाही शोध घेण्यात आला. ‘आयएनएसएल3’चा स्तर एका व्यक्तीपेक्षा दुसर्‍या व्यक्तीमध्ये वेगळा असतो आणि तो हृदयरोग, मधुमेह, लैंगिक संबंधांमध्ये घट आणि हाडांची कमजोरी यांसारख्या समस्यांशी निगडित होता. उच्च ‘आयएनएसएल3’ युक्त पुरुषांमध्ये उतारवयात आजारी पडण्याचा धोका कमी होता असे आढळले. मात्र कमी ‘आयएनएसएल3’ असलेल्या पुरुषांमध्ये वयाशी संबंधित आजार विकसित होण्याचा धोका अधिक होता.

Back to top button