कृत्रिम प्रकाशामुळेही वाढतो मधुमेहाचा धोका

कृत्रिम प्रकाशामुळेही वाढतो मधुमेहाचा धोका

बीजिंग : व्यायामचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव, अनुवांशिकता, सतत गोड खाणे अशा अनेक कारणांमुळे मधुमेहाचा धोका वाढत असतो. मात्र, विजेच्या दिव्यांच्या झगमगाटानेही मधुमेहाचा धोका वाढतो असे आपल्या कधी ऐकिवातही नव्हते. आता संशोधकांनी म्हटले आहे की अशा कृत्रिम प्रकाशामुळे मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांनी वाढतो.

सण-उत्सवांमध्ये शहरातील किंवा बाजारपेठेत केली जाणारी दिव्यांची रोषणाई सर्वांनाच आवडते. मात्र, हीच रोषणाई मधुमेहाच्या आजारालाही जन्म देत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सर्व प्रकारचे कृत्रिम दिवे, मोबाईल-लॅपटॉपसारखे गॅझेटस्, शोरूमच्या बाहेरील एलईडीचे दिवे, कारचे हेडलाईटस् किंवा विविध रोषणाईचे हार्डिंग्स यामुळेही तुम्ही मधुमेहाचा बळी ठरू शकता.

चीनमधील 1 लाख लोकांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की स्ट्रीट लाईट आणि स्मार्टफोनसारख्या कृत्रिम दिव्यांमुळे मधुमेहाचा धोका 25 टक्के वाढतो. खरं तर, रात्रीच्या वेळीही आपल्याला दिवसाचा अनुभव देणारे हे दिवे माणसाच्या शरीराचे घड्याळ बदलू लागतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याची शरीराची क्षमता कमी होते. शांघायच्या रुजिन हॉस्पिटलचे डॉक्टर युजू म्हणतात, जगातील 80 टक्के लोकसंख्येला रात्रीच्या अंधारात प्रकाशाच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

गरजेपेक्षा जास्त प्रकाश हे प्रकाशाचे प्रदूषणच आहे. केवळ चीनमध्ये प्रकाश प्रदूषणामुळे 9 दशलक्ष लोक मधुमेहाचे बळी ठरले आहेत. हे लोक चीनच्या 162 शहरात राहतात. चीनच्या नॉन-कम्युनिकेबल डिसीज सर्व्हिलन्स स्टडीमध्ये ही बाब समोर आली. संशोधनादरम्यान, कृत्रिम प्रकाशात दीर्घकाळ अंधारात राहिलेल्या 28 टक्के लोकांना अन्न पचण्यास त्रास होऊ लागला, कारण प्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन कमी झाले. हा हार्मोन आपली चयापचय प्रणाली योग्य ठेवतो.

वास्तविक, जे लोक सतत कृत्रिम दिव्यांच्या संपर्कात असतात, त्यांच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी काहीही न खाता वाढू लागते. यामुळे आपल्या शरीरातील बीटा पेशींची क्रिया कमी होते. डॉ. जू म्हणतात, अमेरिका आणि युरोपमधील 99 टक्के लोक प्रकाश प्रदूषित आकाशाखाली राहतात. पृथ्वीचे दिवस-रात्रीचे घड्याळ 24 तासांचे असते. हे सूर्यप्रकाश आणि अंधाराने निर्धारित केले जाते. हे या ग्रहावरील प्रत्येक सजीवाला लागू होते, परंतु मानवाने त्याच्या चक्रामध्ये ढवळाढवळ केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news