उच्च रक्तदाबामागील अनुवांशिक भिन्नतेचा शोध

चेन्नई : आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी उच्च रक्तदाबासाठी जबाबदार असलेल्या अनुवांशिक भिन्नतेचा शोध लावला आहे. ‘मॅट्रिक्स मटालो प्रोटिनेज’ (एमएमपीएस) नावाच्या एका जनुकाच्या ‘डीएनए बिल्डिंग ब्लॉक’ मध्ये झालेल्या बदलाने लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.
हा निष्कर्ष काढण्यासाठी संशोधकांनी उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या आणि सामान्य रक्तदाबाच्या लोकांच्या अनुवांशिक प्रोफाईलचा सखोल अभ्यास केला व त्याचे विश्लेषण केले. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांमधील भिंती व धमन्या या भिंतीवर अत्याधिक प्रमाणात कोलेजन जमा झाल्याने कठीण बनतात. शरीरात निर्माण होणार्या प्रोटिन्सचा ‘कोलेजन’ हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा प्रकार आहे.
सामान्यपणे मॅट्रिक्स मटालो प्रोटिनेज8 (एमएमपी 8) नावाचे एन्झाईम अतिरिक्त कोलेजनला खंडित करून त्याचा संचय रोखण्याचे काम करते. मात्र, तरीही एन्झाईमचे कार्य चांगल्या प्रकारे झाले नाही तर किंवा त्यामध्ये असंतुलन झाल्यास अतिरिक्त कोलेजन न तुटता धमन्यांच्या भिंतीला चिकटून राहते. आयआयटी मद्रासच्या जैवतंत्रज्ञान विभागातील संशोधक डॉ. नितीश महापात्र यांनी सांगितले की उच्च रक्तदाबाच्या अनुवांशिक कारणाची निश्चिती हा एक जटिल विषय असून त्यामध्ये अनेक जनुकांची भूमिका असते.
हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब हा भारतातील सर्वाधिक आजार व मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी सुमारे 16 लाख लोकांचा इस्केमिक म्हणजेच बाधित रक्तप्रवाहजन्य हृदयरोग व स्ट्रोक्समुळे आपले प्राण गमावतात असे अनुमान आहे. यापूर्वीच्या अध्ययनांमध्येही रक्तातील ‘एमएमपी 8’ च्या प्रमाणातील बदलामुळे अनेक हृदयरोगांचा परस्पर संबंध असल्याचे म्हटले गेले आहे.