दोन हजार वर्षांपूर्वीचा खंजीर नऊ महिन्यांत झाला स्वच्छ! | पुढारी

दोन हजार वर्षांपूर्वीचा खंजीर नऊ महिन्यांत झाला स्वच्छ!

बर्लिन : जर्मनीत तब्बल 2 हजार वर्षे जुना खंजीर शास्त्रज्ञांना सापडला आहे. हा खंजीर साफ करायला तब्बल नऊ महिने लागले. आता हा चांदीचा खंजीर साफ केल्यानंतर तो पुन्हा नवा असल्याप्रमाणे चमकू लागला आहे.

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. इतिहास संशोधन करणार्‍या एका विद्यार्थाला संशोधनादरम्यान हा खंजीर सापडला. 2019 मध्ये जर्मनीत संशोधनादरम्यान हा खंजीर त्याला आढळून आला होता.

पश्चिम जर्मनीतील मुन्स्टरजवळील हॉलटर्न अ‍ॅम सी येथील प्राचीन स्मशानभूमीजवळ हा खंजीर सापडला. एका जुन्या रोमन लष्करी छावणीजवळ ही स्मशानभूमी होती. 2,000 वर्षांपूर्वी ही स्मशानभूमी येथे बांधली गेली. कालांतराने ही स्मशानभूमी नष्ट होऊन फक्त अवशेष उरले आहेत. मागील दोन शतकांपासून पुरातत्त्वीय विभागामार्फत येथे सातत्याने संधोशन सुरू आहे. या खंजिरावर जाडसर असा थर जमा झाला होता. हा खंजीर साफ करण्यासाठी तब्बल नऊ महिने लागले.

Back to top button