युरोप-अमेरिकेत पाठदुखीमुळे अनेकांनी सोडली चक्क नोकरी! | पुढारी

युरोप-अमेरिकेत पाठदुखीमुळे अनेकांनी सोडली चक्क नोकरी!

लंडन : नोकरी सोडण्याचे एक कारण मान व पाठदुखी असू शकते असे कदाचित आपल्याला वाटणार नाही. मात्र, कोरोना काळात व त्यानंतरही ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना तासन्तास चुकीच्या पद्धतीने बसल्याने अनेकांना हा त्रास सुरू झाला. युरोप-अमेरिकेत तर हा प्रकार इतका आहे की त्यामुळे अनेकांनी आपली नोकरीही सोडून दिली आहे.

ब्रिटनच्या ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार, 3 वर्षांपूर्वी 2019 मध्ये आजारामुळे काम न करू शकणार्‍या लोकांची संख्या 20 लाख होती. आता ती 25 लाख झाली आहे. यापैकी 62 हजार लोकांना मान व पाठदुखीच्या त्रासासामुळे नोकरी सोडावी लागली. यूकेमध्ये मानसिक आजारांनंतर नोकरी सोडण्याचे हे दुसरे मोठे कारण आहे.

लंडनमधील बॅक्स अँड बियाँड क्लिनिकचे संचालक व अस्थिरोगतज्ज्ञ गेविन बर्ट सांगतात, 25 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये पाठ व मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. अनेक तास लॅपटॉपवर वाकून काम केल्याने अनेक जण इतके आजारी पडले की ते बसून काम करण्याच्या स्थितीतच नाहीत. बर्ट सांगतात, कार्यालयात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारची डिझाईन असते. ती आपल्या शरीराला आधार देते. मात्र, घरांत बेडवर किंवा सोफ्यावर तासन्तास काम केल्याने शरीरात वेदना सुरू होतात.

कोरोना महामारीमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चा ट्रेंड वाढला; पण घरी काम करण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. लोकांनी शरीराच्या हिशेबाने योग्य स्थितीत बसण्याकडे अधिक लक्ष दिले नाही. दीर्घकाळ शरीरावर ताण पडल्याने पाठ व मानदुखीचा त्रास झाला. वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदार तरुण याचे सर्वाधिक शिकार झाले.

Back to top button