पिवळ्या सिमला मिरचीत अनेक आरोग्यदायी गुण | पुढारी

पिवळ्या सिमला मिरचीत अनेक आरोग्यदायी गुण

नवी दिल्ली : बाजारात आपण सहसा जी सिमला मिरची किंवा ढबू मिरची पाहतो ती हिरव्या रंगाची असते. मात्र, लाल व पिवळ्या रंगाच्याही सिमला मिरच्या असतात. या मिरच्यांचा स्वादच चांगला असतो असे नाही तर त्यांच्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणही असतात. विशेषतः पिवळ्या रंगाची सिमला मिरची खाणे फायदेशीर ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. रंगीबेरंगी फळे आणि भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. पिवळ्या सिमला मिरचीमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात.

पिवळी सिमला मिरची मध्ये अँटिऑक्सिडंटस् असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. ज्यामुळे अनेक शारीरिक आणि विशेषतः त्वचेशी संबंधित समस्या उद्भवण्यापासून रोखता येतात. या फ्रीरॅडिकल्समुळे कर्करोग होण्याचाही धोका असतो. पिवळ्या सिमला मिरचीचे सेवन केले तर ते शरीरातून मुक्त रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात.

पिवळी सिमला मिरची शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. कारण त्यात उच्च प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् आणि आहारातील फायबर असतात. ही भाजी ‘नॅचरल बॉडी क्लिनर’ म्हणून काम करते. पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही हिरवी, लाल तसेच पिवळी सिमला मिरचीचे सेवन करू शकता. कारण, त्यामध्ये फायबर असते, जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. पाचक प्रणाली आणि आतड्यांसंबंधी हालचालींचे नियमन करते.

पिवळी सिमला मिरची उच्च कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. पिवळ्या सिमला मिरचीचे सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. केसांच्या आरोग्यासाठी देखील पिवळी सिमला मिरची महत्त्वाची असते. केसांचे कूप सक्रिय करण्यासाठी आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यासाठी पिवळी सिमला मिरची मदत करते. पिवळ्या सिमला मिरचीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते, जे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे इत्यादी सोबत लढण्यास मदत करते.

Back to top button