कार्बनच्या उत्सर्जनाने वाढविली जगाची चिंता | पुढारी

कार्बनच्या उत्सर्जनाने वाढविली जगाची चिंता

लंडन : पर्यावरणासाठी घातक ठरत असलेले कार्बनचे उत्सर्जन हा एक जगभरात चिंतेचा विषय ठरला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे इंधनाचा वापर. इंधनाचा जितका जास्त वापर, तितके कार्बनचे जास्त उत्सर्जन. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर जास्त झाल्याने हवेत एक टक्का जास्त कार्बनडाय ऑक्साईड मिसळले. मात्र, जल-वायू परिवर्तनाविरोधी सुरू असलेल्या लढाईसाठी हा एक धक्काच मानला जात आहे.

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जल-वायू चर्चासत्रात ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनातील माहितीनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये यंदा कार्बनच्या उत्सर्जनात घट झाली आहे. तसे पाहिल्यास जगात सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन याच देशात होते. अमेरिकेत मात्र कार्बनचे उत्सर्जन वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी चीनमध्ये जास्त आणि अमेरिकेत कमी उत्सर्जन होत असे. मात्र, यंदा हे उलटे झाले आहे.

चीनमध्ये कार्बनचे उत्सर्जन घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना होय. कोव्हिड 19 च्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनमधील अनेक शहरांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे या देशात इंधनाचा वापर घटला आहे. दरम्यान, एक्सेटर युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक पियरे फ्राईडलिंगस्टिन यांनी सांगितले की, चीनमधील कोरोना महामारी आणि रशिया व युक्रेनमधील युद्धाने कार्बन उत्सर्जनासंबंधीची ही आकडेवारी गोंधळात टाकणारी आहे. यामुळे अचूक निष्कर्ष काढणे आव्हानात्मक आहे.

Back to top button