गणितामुळे विचार बनतात सुस्पष्ट | पुढारी

गणितामुळे विचार बनतात सुस्पष्ट

वॉशिंग्टन : गणिताविषयी मुलांमध्ये नावडच असते असा एक समज आहे, मात्र देश-विदेशात तसे दिसून येत नाही. याउलट मुलांमध्ये गणिताचे एक आकर्षणही असल्याचे दिसून येते. अमेरिकेतील शाळकरी किशोरवयीन मुलांनाही गणित विषयाबद्दल आकर्षण असल्याचे दिसून येते. त्यांना गणित जीवनाच्या प्रत्येक पैलूसाठी गरजेचे वाटते. संगीत-कला एवढेच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही गणित उपयोगी ठरते. केवळ अंकगणितच नव्हे, तर भूमितीही तितकीच फायद्याची असल्याचे या वर्गाचे मत आहे. गणिताचा अभ्यास केल्यास विचारांतही सुस्पष्टता, तर्कसंगतपणा येऊ लागतो असे त्यांचे म्हणणे आहे.

मिआमी कन्ट्री डे स्कूलमधील संगीत विषयाचे विद्यार्थी रेनान म्हणाले, गणित माझ्या कामाबाबत अंतर्गत पातळीवर जोडलेले आहे. संगीतात इंजिनिअरिंग, ऑडिओ सिग्नल्स व गिटारच्या ट्युनिंग सिस्टिमला समजून घेण्यासाठी गणिताचा आधार घ्यावा लागतो. परंतु, गणित विद्यार्थ्यांवर थोपवले जाऊ नये. गणित शिकल्याने करिअरचे अनेक पर्याय खुले होतात.

सोबतच तर्क व विचारांची क्षमता वाढते. यातून समस्येचे निराकरण करण्याचे कौशल्य विकसित होते. व्हँक्युव्हरच्या युनियन हायस्कूलचा विद्यार्थी मार्शल म्हणाला, स्केटबॉर्डिंग, बास्केटबॉल, स्किईंग असो की रुबिक्स क्यूब किंवा स्केचिंग असो.. सर्वांसाठी गणिताची गरज भासते. एखाद्याचा चेहरा नीटपणे रेखाटायचा झाला तरी गणिताचा वापर होतो. कॅरी हायस्कूलचे ग्रे म्हणाले, गणितामुळे आपण विचार करायला शिकतो.

चारही दिशांना आकार, आकडे दिसून येतात. काही मुले म्हणाली, गणित जीवनातील महत्त्वाचे साधन आहे. परंतु, त्याचे महत्त्व सांगण्यासाठी लहानपणी एखादी जाणकार व्यक्ती भोवताली असली पाहिजे. त्यामुळे गणिताविषयीची भीती दूर होऊ शकते. इर्विन हायस्कूलचे टाकुमा म्हणाले, गणिताचा प्रश्न सोडवताना आपण निश्चित फॉर्म्युल्याने निष्कर्ष काढतो. तसेच जीवनातही संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. गणिताप्रमाणेच जीवनातदेखील शॉर्टकट नसतात.

Back to top button