क्रेट बेटावर प्राचीन ग्रीक सभागृहाचे अवशेष | पुढारी

क्रेट बेटावर प्राचीन ग्रीक सभागृहाचे अवशेष

अथेन्स : प्राचीन काळातील ग्रीक लोकांचे क्रीडा व कलेविषयीचे प्रेम सर्वश्रृत आहे. या लोकांनी ठिकठिकाणी अर्धगोलाकार किंवा गोलाकार खुली मैदाने बांधलेली होती. आता अशाच ‘अ‍ॅम्फीथिएटर’ची रचना ग्रीसच्या क्रेट बेटावरही आढळून आली आहे. एका डोंगरातच हे मैदान व त्याच्या भोवती बसण्यासाठीच्या पायर्‍यांचे उंच थर बनवण्यात आले आहेत.

क्रेटच्या नैऋत्य भागात प्राचीन काळातील लिस्सोस या शहराचे अवशेष आहेत. तिथेच एका अतिशय दुर्गम ठिकाणी हे मैदान आढळले आहे. ते आजपर्यंत दुर्लक्षित राहण्याचे कारण म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी डोंगराची उंच चढण चढावी लागते किंवा समुद्राच्या मार्गानेच जावे लागते. हे ठिकाण इतके दुर्गम असल्यानेच गेली अनेक दशके पुरातत्त्व संशोधकांकडूनही ते दुर्लक्षितच राहिले. मात्र, आता या ठिकाणी नव्याने संशोधन सुरू करण्यात आले असून त्यामध्येच या मैदानाचा शोध लागला आहे.

हे मैदान प्राचीन लिस्सोसची संपन्नता दाखवणारे आहे. इसवी सनपूर्व चौथ्या शतकात या शहराचे नाव इतिहासात नोंदले गेले होते. मात्र, तत्पूर्वीच ते एक भरभराटीला आलेले शहर होते. सध्याच्या लिबियाजवळील सिरेन या महत्त्वाच्या ग्रीक शहराजवळ भूमध्य सागरात होते. तिथे औषधांची ग्रीक देवता अ‍ॅसक्लेपियसचे मंदिर, रहिवासी जागा, दफनभूमी, दोन मजली मकबरे, स्नानगृहे यांचे अवशेष सापडलेले आहेत. आता त्यामध्ये या मैदानाचीही भर पडली आहे.

Back to top button