मशरूमला पुरवली कडक ‘सुरक्षा व्यवस्था’!

मशरूमला पुरवली कडक ‘सुरक्षा व्यवस्था’!

लंडन : आळिंबी किंवा 'मशरूम'मध्ये अनेक प्रकार असतात. एक प्रकारची बुरशी असलेल्या 'मशरूम'चे विषारी व बिनविषारी असे प्रकार असतात. बिनविषारी आणि आरोग्यासाठी लाभदायक मशरूमचे जगभर सेवन केले जात असते. त्यांची चवही चांगली असल्याने अनेक लोक मशरूमचा आपल्या नियमित आहारात समावेश करीत असतात. आता इंग्लंडमध्ये तर एका मशरूमला सुरक्षित ठेवण्यासाठी चक्क 'सुरक्षा व्यवस्था'ही पुरवण्यात आली आहे. 'बियर्डेड टूथ मशरूम' नावाची ही आळिंबी स्वादिष्ट तर असतेच; पण विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी ती अत्यंत गुणकारी असते.

इंग्लंडच्या कॉर्नवॉलमधील लॉस्ट गार्डन ऑफ हेलिकनमध्ये पांढर्‍या दाढीसारखी दिसणारी ही आळिंबी आढळून आली. ती कुणी तोडू नये, तिची तस्करी होऊ नये यासाठी तिच्याभोवती लोखंडी पिंजरा उभा करण्यात आला. बागेच्या प्रशासनाने देशातील प्रसिद्ध मशरूम एक्स्पर्टस्ना बोलावून ही मशरूम दाखवली होती व त्यांनीच या मशरूमला पिंजर्‍यात बंद करण्याचा सल्ला दिला होता.

एखाद्या मुलायम कुशनसारखी दिसणारी ही आळिंबी चिनी पारंपरिक औषधांमध्येही वापरली जाते. नैराश्यासारखा मनोविकार दूर करण्यासाठी तसेच कर्करोग दूर ठेवण्यासाठीही ही आळिंबी लाभदायक असते. कुणी पर्यटक या मशरूमला धक्का लावू नये तसेच कुणी ती तोडू नेऊ नये याची काळजी घेणे गरजेचे होते. या मशरूमला किंमतही मोठीच मिळत असल्याने तिची तस्करी होण्याचाही धोका होता. त्यामुळेही एका ओंडक्यावर वाढलेल्या या मशरूमभोवती सुरक्षेसाठी पिंजरा उभा करण्यात आला. युरोप व उत्तर अमेरिकेत तसेच आशियाच्या काही भागात ही आळिंबी आढळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news