

बीजिंग : चीन आपल्या नव्या 'तियांगोंग' अंतराळ स्थानकावर माकडांना पाठवण्याची योजना आखत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, शून्य गुरूत्वाकर्षणात माकडांच्या प्रजनन प्रक्रियेत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. मात्र, चीन आपल्या अंतराळ स्थानकावर माकडांना पाठवून शून्य गुरूत्वाकर्षणाच्या वातावरणात ते कसे वाढतात आणि त्यांचे प्रजनन कसे होते? याचा अभ्यास करणार आहे. ही सर्व प्रक्रिया तियांगोंग अंतराळ स्थानकावर पार पाडली जाणार आहे.
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार चिनी विज्ञान अकादमीचे संशोधक झांग लू यांचा हवाला देऊन एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, शून्य गुरूत्वाकर्षण आणि अंतराळातील वातावरणात माकडांसारखे जीव कसे राहू शकतात, याचा अभ्यास केल्याने भविष्यात मानवी मोहिमांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय अंतराळात माकडे कशी प्रजनन करू शकतात, त्यात कोणत्या समस्या येतात अथवा येऊ शकतात? याचा अभ्यास केल्यास त्याचाही भविष्यातील मोहिमांसाठी उपयोग होणार आहे.
माकडांच्या अंतराळ मोहिमेवेळी या जीवांना खाणे देणे, त्यापासून निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट करणे, ही चिंता चिनी शास्त्रज्ञांना सतावत आहे. या मोहिमेदरम्यान यावर उपाय शोधण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय अंतराळ स्थानकावर माकडांना तणावमुक्त आणि मोकळ्या वातावरणात राहणे अत्यंत अवघड आहे.