

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठा जीव म्हणून 'ब्ल्यू व्हेल'ला ओळखले जाते. मात्र, याच जीवाच्या अस्तित्वाबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या शास्त्रज्ञांच्या मते, हा महाकाय जीव रोज अनेक किलो प्लास्टिक खात आहे. यामुळे ब्ल्यू व्हेल माशांची प्रजात संकटात सापडली आहे.
समुद्रात प्लास्टिक प्रदूषण प्रचंड वेगाने वाढत आहे. हेच प्लास्टिक लहान-मोठे कण मोठ्या प्रमाणात व्हेल माशाच्या शरीरात जात आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. संशोधकांनी अमेरिकेतील पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात बेलिन व्हेलच्या तीन प्रजाती असलेल्या ब्ल्यू व्हेल, फिन व्हेल आणि हंपबॅक व्हेेलद्वारा खालेल्या मायक्रोप्लास्टिकच्या अंदाजित प्रमाणाची माहिती गोळा केली. यावरून त्यांनी या स्तनधारी सागरी जीवांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली.
संशोधनातील निष्कर्षानुसार ब्ल्यू व्हेल रोज एक कोटी मायक्रोप्लास्टिक खाऊ शकते. फिन व्हेलची मुख्य शिकार म्हणजे क्रिल हा सागरी जीव असून तो रोज 0.6 कोटी मायक्रोप्लास्टिकचे तुकडे खाऊ शकतो. याची शिकार करताच अनायासे फिन व्हेलच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक जाते. व्हेलच्या तुलनेत अन्य मासे कमी प्रमाणात मायक्रोप्लास्टिक गिळत असतात. संशोकांनी 126 ब्ल्यू व्हेल, 65 हंपबॅक आणि 29 फिन व्हेलवर हे संशोधन केले आहे.
नेचर कम्युनिकेशन्स नामक जर्नलमध्ये हे महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधक मॅथ्यू सॉविका यांच्या मते, समुद्रातील सुमारे 99 टक्के मासे आपल्या भक्ष्याच्या माध्यमातून प्लास्टिकचे सेवन करत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे.