अवकाशात आढळली अणू वायू संरचना | पुढारी

अवकाशात आढळली अणू वायू संरचना

बीजिंग : आपले ‘ब्रह्मांड’ हे असंख्य रहस्यांनी भरले आहे. यामध्ये रोज काही ना काही नव-नवे सापडतच असते. अशा अवकाशातच ‘स्टिफन क्विंटेट’ नामक आकाशगंगांचा एक समूह आहे. खरे तर याचा शोध फार पूर्वी लावण्यात आला होता. मात्र, याबाबतचे संशोधन आजही सुरूच आहे. चीनच्या पाचशे मीटर रूंद ‘स्पेरिकल टेलिस्कोप’च्या मदतीने या आकाशगंगेच्या समूहाबाबत एक नवा शोध लावण्यात आला. या शोधानुसार स्टिफन क्विंटेट आकाशगंगांच्या समूहाच्या चारही बाजूला अणू वायू संरचना पसरली आहे.

‘नेचर’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार ‘स्टिफन क्विंटेट’ आकाशगंगेच्या समूहाभोवतीची ही ‘अणू वायू संरचना’ तब्बल 20 लाख प्रकाशवर्षे इतक्या परिसरापेक्षाही जास्त भागात पसरली आहे. हे अंतर आपली आकाशगंगा व एंड्रोमेडा गॅलक्सी यांच्यातील अंतराइतके आहे. दरम्यान, ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’चे नॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीचे संशोधक लिड जू कांग यांच्या मते, स्टिफन क्विटेंट या आकाशगंगेच्या समूहाभोवती मोठा ‘अटॉमिक गॅस स्ट्रक्चर’ आहे. जो आजपर्यंत शोधण्यात आलेली सर्वात मोठी वायू संरचना आहे.

दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मते, ब्रह्मांडातील तमाम तारे हे परमाणू हैड्रोजन गॅसनेच तयार झालेले आहेत. हा वायू अत्यंत सहजपणे आकाशगंगेपासून बाहेर पडू शकतो. खासकरून विलयादरम्यान हा वायू आकाशगंगेमधून बाहेर पडण्याची शक्यता बळावते.

Back to top button