बर्फाच्छादित आर्क्टिकमध्ये घडताहेत रासायनिक बदल | पुढारी

बर्फाच्छादित आर्क्टिकमध्ये घडताहेत रासायनिक बदल

लंडन : जलवायू परिवर्तनाचा सर्वाधिक परिणाम आर्क्टिक महासागरावर होत आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार आर्क्टिकमधील बर्फ वितळून तयार होत असलेले पाणी महासागरात मिसळत आहे. यामुळे या सागरी पाण्याचे वेगाने आम्लीकरण होत आहे. बर्फाच्या स्वच्छ पाण्यामुळे या महासागराचे रासायनिक समतोलपणाही बिघडत चालला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवासीय त्रस्त बनले आहेत. मात्र, याचा सर्वात मोठा फटका ध्रुवीय भागांना बसत आहे. मात्र, यामध्ये आर्क्टिक महासागर जरा जास्तच होरपळत आहे. म्हणूनच या भागात जलवायू परिवर्तनाशी संबंधित सर्वाधिक संशोधने करण्यात येत आहेत.

‘गेथेनबर्ग युनिव्हर्सिटी’च्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनातील माहितीनुसार पृथ्वीवरील इतर भागाच्या तुलनेत आर्क्टिक महासागराचा भाग जास्त उष्ण होत आहे. यामुळे या महासागराचे रसायनशास्त्रही वेगाने बदलत आहे. या बर्फाच्छादित भागात तापमान वाढल्याने बर्फ वितळण्याचा वेगही वाढला आहे. स्वच्छ पाणी मिसळत असल्याने सागरीय पाण्याचे आम्लीकरणही वेगाने होत आहे.

या संशोधनात असेही आढळून आले की, जसजसे आर्क्टिक महासागरातील बर्फ वितळू लागला आहे, तसे हा महासागर जास्त प्रमाणात कार्बनडायॉक्साईडचे अवशोषण करत आहे. तसेच वेगाने आम्लीकरणही होत आहे. यामुळे या महासागरातील अन्नाची साखळी विस्कळीत होऊ शकते. तसेच जलचरांच्या प्रजाती संकटात सापडण्याची शक्यता बळावत आहे.

Back to top button