कॅन्सरवरील प्रभावी औषधाचा लावला शोध | पुढारी

कॅन्सरवरील प्रभावी औषधाचा लावला शोध

लंडन : कॅन्सर अथवा कर्करोगाने जगात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. मात्र, युरोपमधील शास्त्रज्ञांनी या गंभीर आजारावर प्रभावी ठरणार्‍या औषधाचा शोध लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. आपण एक असे औषध शोधले आहे की, ते कॅन्सरला कारणीभूत ठरणार्‍या जीनला रोखण्यास उपयोगी ठरेल, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

कॅन्सरवर संशोधन व उपचार करणार्‍या युरोपियन संस्थेने म्हटले आहे की, कॅन्सर होण्यास जबाबदार असलेल्या ‘एमवायसी’ या जीनला रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारे औषध तयार करण्यात यश आले आहे. ‘ओएमओ 103 मेडिसिन’ असे या औषधाचे नाव आहे. पहिल्या चाचणीत हे औषध फारच प्रभावी ठरले आहे. एमवायसी जीनला रोखणारे यापूर्वी कोणतेच औषध उपलब्ध नव्हते.

हेब्रोन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीच्या माहितीनुसार ‘ओएमओ 103’ हे औषध ‘मिनी प्रोटिन’च्या रूपात विकसित करण्यात आले आहे. हे औषध कोशिकांमध्ये प्रवेश करून कॅन्सर ट्यूमरला जबाबदार असणार्‍या एमवायसी जीनला यशस्वीपणे रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हेच जीन स्तन, प्रोस्टेट, फुफ्फूस, ओवेरियन कॅन्सर यासारख्या प्रकारांना कारणीभूत ठरत असते. 2021 मध्ये 22 रुग्णांवर घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत ‘ओएमओ 103’ हे औषध जरी यशस्वी ठरले असले तरी यावर आणखी चाचणी घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Back to top button