मंगळावर वेगाने धडकले उल्कापिंड | पुढारी

मंगळावर वेगाने धडकले उल्कापिंड

वॉशिंग्टन : मंगळाचा अभ्यास करणार्‍या खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी प्रचंड वेगाने एक उल्कापिंड मंगळावर धडकले होते. ही धडक इतकी भीषण होती की, यामुळे लालग्रहावर 4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

चार वर्षांपूर्वी मंगळावर उतरलेल्या ‘नासा’च्या ‘इनसाईट लँडर’ने लालग्रहाला बसलेल्या या भीषण धडकेचा शोध लावला. ज्या ठिकाणी ही धडक झाली, तेथून ‘नासा’चे यान 3500 कि.मी. दूर अंतरावर होते. या ग्रहावर बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांना ‘मार्सक्वेक’ असे म्हटले जाते. या घटनेची पुष्टी ‘मार्स रिकॉनिसेेन्स ऑर्बिटर’ने केली आहे. याशिवाय धडकेनंतरच्या अवघ्या 24 तासांत ऑर्बिटरने धडकेच्या जागेची छायाचित्रे कॅमेराबद्ध केली.

प्रचंड वेगाने उल्कापिंड धडकल्यामुळे मंगळावर 150 मीटर रूंद आणि 21 मीटर खोल खड्डा (विवर) तयार झाला. उल्लेखनीय म्हणजे या विवरानजीक बर्फही दिसून येत आहे. ‘मार्स रिकॉनिसेेन्स ऑर्बिटर’ने 16 वर्षांपूर्वी मंगळाभोवती फिरण्यास सुरुवात केली. तेव्हापासून या ऑर्बिटरने पाहिलेले हे सर्वात मोठे विवर ठरले आहे. मंगळाला धडणारा उल्कापिंड सुमारे 16 ते 39 फूट आकाराचा होता. याच आकाराचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर धडकल्यास वातावरणच नष्ट होऊ शकते. या धडकेचा मंगळावर फारसा प्रभाव पडला नाही. मात्र, या धडकेने मंगळाचा आंतरिक भाग दिसून येत असून यामुळे या ग्रहाच्या निर्मितीच्या इतिहासाबद्दल माहिती मिळू शकते.

अमेरिकन संशोधन संस्था ‘नासा’ने या धडकेचे ऑडिओ रेकॉर्डिंगही शेअर केले आहे. जे सिस्मोमीटरद्वारा गोळा केलेल्या व्हायब्रेशनच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

Back to top button