पर्यावरणासाठी जुनी झाडे उपयुक्त | पुढारी

पर्यावरणासाठी जुनी झाडे उपयुक्त

लंडन : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसेच जलवायू परिवर्तनावर एक महत्त्वाचा उपाय म्हणून जुनी झाडे वाचवणे महत्त्वाचे ठरते. कारण अशी झाडे अनेक जीवांसाठी निवासाचे काम करतात. तसेच वातावरणातील कार्बन शोषून घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार जुनी झाडे वाचवल्यास त्यांचा पर्यावरणाचे संरक्षण करण्यास तसेच जलवायू वाचविण्यात मदत मिळते.

शतकानुशतके झाडांचा वापर होत आहे. केवळ इंधनासाठी नव्हे तर घरे, कागद, औषधे, रसायने तसेच अन्य बाबतीत झाडांचा वापर करण्यात येत आहे. मात्र, ट्रेंडस् इन इकॉलॉजी अँड इव्हॅल्यूशन नामक शोधपत्रिकेत खासकरून जुन्या झाडांच्या उपयोगावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या संशोधनात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जुनी झाडे ही एक वेगळ्या प्रकारच्या निवासासारखे असतात. अशी झाडे संकटात सापडलेल्या प्रजातींच्या संरक्षणात फारच उपयोगी पडतात. याशिवाय अशी झाडे जलवायू परिवर्तन व ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण मिळवण्यात जास्त उपयोगी ठरतात. अमेरिकेतील व्हाईट पर्वतावर आढळणारी ब्रिस्टलकोन पाईन्सची झाडे तब्बल पाच हजार वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. अशी झाडे वातावरणातील कार्बन शोषून घेण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

झाडांमध्ये सभोवतालची परिस्थिती बदलण्याची तसेच ती थंड ठेवण्याची क्षमता असते. याशिवाय ऑक्सिजनचे प्रमुख स्त्रोत म्हणून झाडांना ओळखले जाते. अशी जुनी व नवी झाडे वाचविण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे.

Back to top button