भारतीय खात आहेत मर्यादेपेक्षा दुप्पट साखर | पुढारी

भारतीय खात आहेत मर्यादेपेक्षा दुप्पट साखर

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण देशभरात गेल्या काही वर्षांपासून मधुमेही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा एकदा आजार जडला की तो कमी होण्याचे नाव घेत नाही. बदलती जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव तसेच फास्टफूडवर भर अशा काही कारणांमुळे या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यावर नियंत्रण मिळविले नाही, तर भारतात 2025 पर्यंत मधुमेहींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे इंटरनॅशनल डायबिटीज फाऊंडेशनने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दिवसभरात कमीत कमी सहा चमचे साखर खाणे आरोग्यासाठी योग्य आहे; पण भारतात एक दिवसात 10 ते 12 चमचे साखर खाल्ली जाते. यामुळे भारत आता सध्या डायेबेटिक कॅपिटल बनू लागला आहे. अतिगोड असलेल्या पाकीटबंद खाण्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर बनू लागली आहे.

गोड खाण्याची सवय ही सावकाशपणे आजाराकडे नेणारी ठरत आहे. या सवयीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जर का हे असेच सुरू राहिले तर 2025 पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2017 मध्ये भारतात सुमारे 7 कोटी 20 लाख इतके मधुमेही रुग्ण होते. मात्र, हीच संख्या 2025 मध्ये दुप्पट होणार आहे. या आजारापासून दूर राहण्यासाठी अतिगोड पदार्थ खाण्यापासून दूर राहण्याबरोबरच नियमित व्यायामावर भर देण्याची गरज आहे.

Back to top button