प्राचीन लोकांनाही होते सूर्यग्रहणाबाबत कुतूहल | पुढारी

प्राचीन लोकांनाही होते सूर्यग्रहणाबाबत कुतूहल

नवी दिल्ली ः ऐन दिवाळीत यंदा मंगळवारी सूर्यग्रहण झाले. ग्रहणाच्या या खगोलीय घटना प्राचीन काळापासूनच मानवाच्या कुतूहलाचा विषय बनलेल्या आहेत. आता विज्ञानाने मोठीच प्रगती केलेली असल्याने या घटनांमागील तथ्य सर्वांनाच माहिती आहे.

मात्र, जुन्या काळात लोकांचे या घटनेबाबत अनेक समज असत. सूर्यग्रहणाच्या अनेक प्रकारच्या प्राचीन नोंदी आढळतात. तसेच ग्रहणाबाबतचा प्राचीन लोकांचा अभ्यासही दिसून येतो. आयर्लंडनिवासी आर्कियो अ‍ॅस्ट्रॉनॉमर पॉल ग्रीफिनने आपल्या देशातील ऐतिहासिक दगडांवर संशोधन केले. हे दगड विशिष्ट वैज्ञानिक पद्धतीने ठेवलेले होते. ते इसवी सन पूर्व 3340 मधील 30 नोव्हेंबरच्या सूर्यग्रहणाला दर्शवते.

इसवी सन पूर्व 2137 म्हणजेच 4158 वर्षांपूर्वी चीनी राजा चुंग कांग ग्रहणाविषयी माहिती देण्यासाठी त्याच्या दरबारात दोन खगोलशास्त्रज्ञ ठेवायचा. बॅबिलॉनमध्ये इसवी सनपूर्व 518 ते इसवी सनपूर्व 465 या काळातील मातीच्या गोळ्यावर सूर्यग्रहणाचे लिखित पुरावे आहेत. यामध्ये इसवी सन पूर्व 1375 म्हणजेच सुमारे 3400 वर्षांपूर्वी 3 मे रोजी उगरैत नावाच्या जागेवर पूर्ण सूर्यग्रहण दिसल्याबद्दलची नोंद आहे. इसवी सन पूर्व 647मध्ये 6 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहणाचा उल्लेख ग्रीक कवी आर्किलोचुस यांनी केला होता. इसवी सन पूर्व 585 मध्ये ग्रीक विद्वान थेल्सने सूर्यग्रहण लागण्याची भविष्यवाणी केली होती. हा तो काळ होता ज्यावेळी ग्रीसमध्ये सहा वर्षांपासून लिडियन आणि मेडसमध्ये युद्ध सुरू होते. या सूर्यग्रहणानेच हे युद्ध थांबले! प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये खगोलशास्त्राचा चांगला अभ्यास होत असल्याचे दिसून येते. ऋग्वेदात पाचव्या मंडलाच्या 40 व्या सुक्तात सूर्यग्रहणाचे वर्णन आहे. विष्णुपुराणासारखी अनेक पुराणे तसेच महाभारतातही सूर्यग्रहणाचे वर्णन आहे.

 

Back to top button