टाचेला का पडतात भेगा? | पुढारी

टाचेला का पडतात भेगा?

नवी दिल्ली : बदलत्या हवामानामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. टाचेला भेगा पडणे ही त्यापैकीच एक समस्या. बर्‍याचदा थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा जातात अशा तक्रारी अनेकजण करतात; पण खरंच त्यामागे हेच कारण आहे का?

सर्वांच्याच पायांना थंडीमुळे भेगा पडतात असं नाही. अनेकदा हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता हीसुद्धा यामागची कारणे असू शकतात. फरक फक्त इतकाच की, थंडीच्या दिवसांत ही समस्या आणखी बळावते. हिवाळ्यामध्ये आपण शरीर गरम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. लोकरी कपडेही घालतो; पण या सार्‍यामध्ये पायांकडे मात्र दुर्लक्ष होते. हिवाळ्यातली कोरडी हवा त्वचा आणि तळव्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळे पायांवर असणारी मृत त्वचा रुक्ष होऊन फाटू लागते. थंडीमध्ये पायांना भेगा पडतात असं म्हणणार्‍यांसोबतच आमच्या पायांना वर्षभर भेगा असतात असं म्हणणारेही कमी नाहीत. वर्षभर हा त्रास असणार्‍या व्यक्तींच्या शरीरात काही पोषक घटकांचा अभाव असतो. यामध्ये व्हिटॅमिन बी 3, ई आणि सी यांचा समावेश आहे. ज्यांच्या अभावी त्वचा रुक्ष आणि निर्जीव दिसू लागते.

Back to top button