गव्हांकुरचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे | पुढारी

गव्हांकुरचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

नवी दिल्ली : मोड आलेल्या कडधान्याला ‘सुपरफूड’ असं म्हटलं जातं. आरोग्याला ते खूप उपयुक्त असतं. यात असलेल्या अनेक उपयुक्त घटकांमुळे शरीराला याचा भरपूर फायदा होतो. शरीर सुद़ृढ आणि निरोगी ठेवायचं असेल तर आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असायलाच हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. त्यामुळे मूग, मटकी, वाल, हरभरा, वाटाणा अशा कडधान्यांचं सेवन अनेक जण करतात. परंतु ‘स्प्राऊटेड व्हीट’ म्हणजेच गव्हांकुरबद्दल खूप कमी जणांना माहिती आहे. मोड आलेल्या कडधान्यांप्रमाणेच गव्हांकुरही निरोगी राहण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

गव्हाचं सेवन जगभरात मोठ्या प्रमाणात केलं जातं. गव्हाच्या पिठापासून तयार होणार्‍या चपात्या तर भारतीयांच्या मुख्य अन्नघटकांपैकी एक आहे. गव्हामध्ये अनेक पोषक घटक असून, ते आरोग्याला खूप उपयुक्त ठरतात. अंकुर फुटलेले गहू म्हणजेच गव्हांकुरामुळेही निरोगी राहण्यास मदत होत असते. वजन खूप वाढलं असल्यास अंकुर फुटलेल्या गव्हांचं सेवन तुम्ही करू शकता. नाश्त्यामध्ये गव्हांकुराचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जा कायम राहते व बराच वेळ भूक लागत नाही आणि वारंवार जेवण्याची इच्छा राहत नाही. अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. अपचनाशी संबंधित समस्या असल्यास दररोजच्या आहारात गव्हांकुराचा समावेश करायला हवा. कारण यात फायबर्सचं प्रमाण अधिक असतं.

बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित तक्रारी यामुळे दूर होऊ शकतात. वाढत्या वयाबरोबर हाडांची मजबुती कमी होत जाते. हळूहळू अशक्तपणा जाणवायला लागतो. या समस्येपासून सुटका मिळवायची असल्यास सकाळी उठल्यानंतर अंकुर फुटलेल्या गव्हांचं सेवन करायला हवं. यात कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यानं याचा आहारात समावेश करायला हवा. हाडांच्या मजबुतीसाठी गव्हांकुरांचं सेवन करणं कधीही चांगलं.

Back to top button