मुलांशी सतत कठोर वागल्याने ‘डीएनए’वरही होतो परिणाम | पुढारी

मुलांशी सतत कठोर वागल्याने ‘डीएनए’वरही होतो परिणाम

न्यूयॉर्क : पालकांच्या कडक वागण्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मोठे झाल्यावरही ते त्यावर मात करू शकत नाहीत. मुलांना त्यांच्या खोड्यांबद्दल किंवा अभ्यास व शिस्तीसाठीही फटकारले जाते; परंतु नेहमीच कठोर राहिल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो. पालकांनी आपल्या मुलांशी नेहमी कठोरपणे वागले तर त्याचा परिणाम मुलांच्या ‘डीएनए’वर होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

बेल्जियममधील युनिव्हर्सिटी ऑफ ल्युवेनच्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की पालकांची कठोर वृत्ती मुलाच्या ‘डीएनए’मध्ये बदल करू शकते. शास्त्रज्ञांनी या अभ्यासात सहभागी असलेल्या सर्व मुलांच्या ‘डीएनए’मध्ये साडेचार लाख स्पॉटस् शोधून काढले, जे पालकांच्या टोमण्यांनी प्रभावित आहेत. अ‍ॅमस्टरडॅम मेडिकल सेंटर विद्यापीठातील प्राध्यापक क्रिस्टियान विंकर्स यांनी स्पष्ट केले की, तणाव डीएनए मेथिलेशनच्या नियामक यंत्रणेवर परिणाम करतो. हे जुने आणि विसरलेले तणावदेखील जागृत होतात.

या अभ्यासात सहभागी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कठोर पालकत्वातून गेलेली मुले मोठी झाल्यावरही मित्र बनवू शकत नाहीत. अशा मुलांसाठी लोकांशी भावनिक संबंध जोडणे कठीण आहे. ते समाजापासून दूर राहतात. त्यांना अभ्यासात फारशी चांगली कामगिरी करता येत नाही. ते आजारी पडू लागतात. याचा परिणाम मुलाला आयुष्यभर जाणवतो. शास्त्रज्ञांनी हा अभ्यास बेल्जियममधील 12 ते 16 वयोगटातील 23 मुला-मुलींवर केला. दुसर्‍यांसमोर रागावल्याने मुले हट्टी आणि रागीट होतात, गोष्टी लपवतात, असेही दिसून आले आहे.

Back to top button