मानवी मेंदूच्या पेशींचे उंदराच्या मेंदूत प्रत्यारोपण | पुढारी

मानवी मेंदूच्या पेशींचे उंदराच्या मेंदूत प्रत्यारोपण

वॉशिंग्टन : संशोधनासाठी अनेक प्रकारचे ‘हट के’ प्रयोग केले जात असतात. आताही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. मानवी मेंदूच्या पेशींचे या प्रयोगात चक्क उंदराच्या मेंदूत प्रत्यारोपण केले आहे. या प्रयोगामुळे ‘न्यूडो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर’ सखोलपणे समजून घेण्यास मदत होईल, असे मत संशोधकांनी मांडले आहे.

मानसिक विकारांवर संशोधन आणि मेंदूच्या विकासासाठी नवीन पद्धती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी टीमने प्रयोगशाळेत विकसित मानवी न्यूरॉन्स आणि त्यांच्या सहायक पेशी घेतल्या आणि नवजात उंदरांच्या विकसनशील मेंदूमध्ये त्यांचे प्रत्यारोपण केले. जसे जसे उंदीर मोठे होत गेले तसे उंदरांच्या मेंदूमध्ये मानवी न्यूरॉन्स कार्य करू लागले.

तसेच अनेक सर्किटही तयार करू लागले. या सर्किटस्चा उपयोग न्यूरो डेव्हलपमेंटल विकारांच्या अभ्यासासाठी केला जाऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पावलोव्हियन प्रयोगात मानवी पेशींमधील सर्किटस् उंदरांच्या मेंदूतील लहान ऑर्गनॉइडस्ना उत्तेजित करून त्यांच्या वर्तनावर थेट प्रभाव पाडत होते. या प्रत्यारोपणाने उंदरांच्या कार्यपद्धतीवर कोणताही बदल झालेला नाही.

Back to top button