‘इस्रो’च्या सर्वात वजनदार रॉकेटचे 23 ऑक्टोबरला प्रक्षेपण | पुढारी

‘इस्रो’च्या सर्वात वजनदार रॉकेटचे 23 ऑक्टोबरला प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे सर्वात वजनदार रॉकेट ‘जीएसएलव्ही एमके 3’चे रविवार, दि. 23 ऑक्टोबरला प्रक्षेपण केले जाणार आहे. मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात येईल.

‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ या ‘इस्रो’च्या व्यावसायिक कंपनीने ब्रिटनमधील लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कम्युनिकेशन्स कंपनी असलेल्या ‘वन वेब’शी केलेल्या करारानुसार हे व्यावसायिक उड्डाण होणार आहे. यावेळी 36 उपग्रहांना अंतराळात सोडण्यात येईल. ‘इस्रो’ने म्हटले आहे की या रॉकेटच्या प्रक्षेपणाची अंतिम तयारी सध्या सुरू आहे. ‘जीएसएलव्ही एमके 3’ हे तीन भागांचे वजनदार रॉकेट आहे.

‘इस्रो’नेच हे लाँच व्हेईकल विकसित केले आहे. त्यामध्ये दोन सॉलिड स्ट्रॅप-ऑन मोटर्स (घनरूप इंधनाचे ज्वलन करणार्‍या मोटर्स), कोअर-स्टेज लिक्विड बूस्टर आणि एक क्रायोजेनिक अपर स्टेज (द्रवरूप हायड्रोजन व द्रवरूप ऑक्सिजनचे ज्वलन करणारे) आहे.

हे रॉकेट 4 टन वजनाचे सॅटेलाईट अंतराळात जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये नेऊ शकते. तसेच 10 टनाचा सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटपर्यंत नेऊ शकते.

Back to top button