

टोकियो : जपानमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पर्यावरणाचाही विचार केला जातो. आता तिथे याच द़ृष्टीने एक नव्या प्रकारचे कमोड विकसित करण्यात आले आहे. कमोड वापरल्यानंतर फ्लशने भरपूर पाणी सोडले जात असते. आता अशा पाण्याची बचत व्हावी यासाठी हे नवे कमोड बनवले असून ते सिंकमध्ये हात धुण्यासाठी सोडलेले पाणी वापरते.
हे टॉयलेट दरवर्षी लाखो लिटर पाण्याची बचत करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ते पर्यावरणपूरक असून त्याच्या विशिष्ट डिझाईनमुळे वॉशरूममधील जागाही वाचते असे म्हटले जाते. ट्विटरवरून या कमोडचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या कमोडला सिंक जोडण्यात आलेले आहे. हात धुतल्यानंतर जे पाणी जमा होते ते फ्लशसाठी वापरले जाते. पाण्याचा पुनर्वापर होत असल्याने पाणी वाया जात नाही असा दावा करण्यात आला आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होते. अशावेळी पाण्याची बचत करणे लाभकारक ठरू शकते व त्यामुळे हे टॉयलेट उपयुक्त असल्याचेही सोशल मीडियात म्हटले आहे.