‘इंजिन्युटी’च्या एका पायात दिसला धागा! | पुढारी

‘इंजिन्युटी’च्या एका पायात दिसला धागा!

वॉशिंग्टन : मंगळभूमीवर सध्या ‘नासा’चे पर्सिव्हरन्स रोव्हर आणि इंजिन्युटी हेलिकॉप्टर जेझेरो क्रेटर नावाच्या विवरात जीवसृष्टीचे पुरावे शोधत आहेत. आता इंजिन्युटीबाबत एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. या हेलिकॉप्टरच्या चारपैकी एका पायावर धाग्यासारखी एक वस्तू अडकली असल्याचे दिसून आले आहे.

‘नासा’च्या वैज्ञानिकांनी सप्टेंबरच्या अखेरीस मंगळावर ‘इंजिन्युटी’चे उड्डाण घडवून आणले होते. याचवेळी इंजिन्युटीच्या कॅमेर्‍यात त्याच्या एका पायावर अडकून लोंबत असलेली एक वस्तू दिसून आली.

या उड्डाणावेळी ‘नासा’च्या संशोधकांना आढळले की इंजिन्युटीच्या पायात काही तरी अडकले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर अनेकांनी नेहमीप्रमाणेच एलियन्सनी इंजिन्युटीच्या पायात ही वस्तू अडकवल्याचे म्हणण्यास सुरुवात केली. अर्थात ही वस्तू मंगळभूमीवर यानाचे जे अवशेष पडलेले असतात त्यापैकीच एक आहे. मिशनच्या ‘नेव्हकॅम’ने हे फुटेज रेकॉर्ड केले आहे. त्यामध्ये दिसते की उड्डाणावेळी एका पायात ही धाग्यासारखी वस्तू अडकलेली आहे व नंतर ती निसटून खाली पडते.

यापूर्वीही मंगळावरील फुटेजमध्ये यानांचे अवशेष दिसून आले होते. ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे की इंजिन्युटी आता विस्तारित मिशनसह एक चांगले उड्डाण करीत आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर प्राचीन काळी जीवसृष्टीचे अस्तित्व होते का याबाबतचे पुरावे गोळा करीत आहे. तर इंजिन्युटी हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्ससाठी एक टेस्ट स्काऊटसारखे काम करीत आहे.

Back to top button