आता बुद्धिबळाचा खेळ तिघेजण खेळू शकतील! | पुढारी

आता बुद्धिबळाचा खेळ तिघेजण खेळू शकतील!

नवी दिल्ली : बुद्धिबळाचा खेळ ही प्राचीन भारतीयांनी जगाला दिलेली एक देणगी आहे. आता याच भारत देशात दोघांऐवजी तिघे बुद्धिबळ खेळण्याची पद्धतही विकसित करण्यात आली असून या खेळाचे अतिरिक्त नियमही बनवण्यात आले आहेत. साधारणपणे पत्ते, कॅरम व अन्य काही बैठे खेळ तिघेजण खेळत असतात. मात्र, बुद्धिबळासारखा खेळ दोघांऐवजी तिघेजण खेळण्याची ही पद्धत अनोखीच आहे.

काळ्या-पांढर्‍या सोंगट्यांसह तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळायचा बैठा खेळ आहे. या पटावर 64 घरं असतात. एक राजा, एक वजीर, दोन हत्ती, दोन घोडे, दोन उंट आणि आठ प्यादी अशी दोन्ही बाजूला मांडणी असते. मात्र, आता काळानुसार बुद्धिबळाच्या पटात अपडेट झाला आहे. आयआयटी रुरकीच्या एका विद्यार्थ्याने नवीन बुद्धिबळ बोर्ड तयार केला आहे ज्यावर तिघेजण एकाच वेळी बुद्धिबळ खेळू शकतात.

बी.टेक 2014 बॅचच्या आदित्य निगमने आपल्या गेमिंग स्टार्टअपद्वारे हे नवीन बुद्धिबळ बोर्ड विकसित केले आहे. त्याला ‘ट्रायविझार्ड बुद्धिबळ’ म्हणून ओळखले जाते. आदित्य निगमने आयआयटी रुरकी येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान या ट्रायविझार्ड बुद्धिबळाची ओळख करून दिली होती. या ट्रायविझार्ड बुद्धिबळ पटाबाबत सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे त्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. खेळ पूर्वीप्रमाणे खेळता येईल. मात्र, आता दोनऐवजी तीन खेळाडू एकाच वेळी खेळू शकणार आहेत.

बुद्धिबळ खेळण्याकडे कल वाढावा यासाठी आदित्य निगम यांनी सांगितलं की, ‘या नव्या फॉरमॅटमुळे खेळाडूंची संख्या वाढणार आहे. यामुळे संपूर्ण खेळाचा द़ृष्टिकोन बदलेल. या नवीन गेममध्ये तीन खेळाडूंसह, प्रत्येक खेळाडूला इतर दोन खेळाडूंच्या चाली एकाच वेळी समजून घ्याव्या लागतील. वीन गेम क्लॉकवाइज पद्धतीने खेळायचा आहे. ज्यामध्ये प्रथम पांढरा, नंतर तपकिरी आणि शेवटी काळा रंगाच्या सोंगट्या असलेल्याला संधी मिळेल. एक खेळाडू दोन लोकांना एकाचवेळी चेकमेट देऊ शकतो.’

Back to top button