नवी दिल्ली : 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' म्हणजे 'इस्त्रो'च्या चांद्रयान-2 ऑर्बिटरने चंद्रावर प्रथमच सोडियमचा शोध लावला. ऑर्बिटरमध्ये बसवण्यात आलेल्या 'एक्स-रे स्पेक्टोमीटर क्लास'ने हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या शोधामुळे चंद्रावर असलेल्या सोडियमचे अचूक प्रमाण शोधण्याचा मार्ग खुलला आहे.
'द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या इस्त्रोच्या या संशोधनातील माहितीनुसार क्लास स्पेक्टोमीटरने आपल्या अचूक संवेदनशीलता आणि परिश्रमाच्या बळावर चंद्रावरील सोडियमच्या पातळ आवरणाचा शोध लावला आहे. हे क्लास स्पेक्टोमीटर बंगळूर येथील इस्त्रोच्या 'यूआर राओ सॅटेलाईट सेंटर'मध्ये तयार करण्यात आले आहे.
संशोधकांच्या मते, सोडियमचे आवरण चंद्रावरील जमिनीशी चिकटले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रावर ज्या ठिकाणी सोडियम सापडले आहे, त्या भागाला एक्सोस्फेअर असे म्हटले जाते. हा भाग चंद्राच्या जमिनीपासून सुरू होऊन हजारो किमी परिसरात पसरला आहे. चांद्रयान-2 ने लावलेल्या या शोधामुळे चंद्र व एक्सोस्फेअर यांच्यातील संबंध व ताळमेळ शोधण्यास मदत मिळणार. चांद्रयान-2 पूर्वी चांद्रयान-1 च्या 'एक्स-रे फ्लोरेसेंस स्पेक्टोमीटर'नेही चंद्रावर
सोडियम असल्याची शक्यता व्यक्त केली होती. चांद्रयान-2 हे चांद्रयान-1 मिशनची सुधारित आवृत्ती असून ती 22 जुलै 2019 रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच करण्यात आली होती. यात ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे.