2025 पर्यंत चंद्रावर वनस्पती उगवण्याचा प्रयत्न | पुढारी

2025 पर्यंत चंद्रावर वनस्पती उगवण्याचा प्रयत्न

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ 2025 पर्यंत चंद्रावर झाडे उगविण्यासंबंधीचे प्रयत्न करत आहेत. या शास्त्रज्ञांनी नुकतीच यासंबंधीच्या मिशनची घोषणा केली. या मिशनमधील माध्यमातून भविष्यात मानवाचा चंद्रावर राहण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता बळावली आहे.

क्विन्सलँड युर्निर्व्ह टेक्नॉलॉजी’ मधील वनस्पती शास्त्रज्ञ ब्रेट विलियम यांनी सांगितले की, खासगी इस्त्रायली मिशनअंतर्गत चंद्रावर जात असलेल्या बेरेशिट 2 या अंतराळ यानातून झाडाच्या बिया पाठवण्यात येईल. चंद्रावर पोहोचल्यानंतर या बिया एका बंद चेंबरमध्ये ठेऊन त्यांना पाणी पुरविले जाईल. त्यानंतर त्यांचे अंकुरणे व विकासावर नजर ठेवण्यात येईल. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत कसे जिवंत राहतात आणि ते केवढ्या लवकर अंकुरित होतात, यावर बियांची निवड करण्यात येणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियात अशी एक वनस्पती आहे की, ती पाण्याविनाही जिवंत राहू शकते. तिचे नाव ‘ रिजरेक्शन ग्रास’ असे आहे. यासंर्भात शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा प्रयत्न म्हणजे सुरुवातीचे पाऊल आहे. अन्न, औषधे व ऑक्सिजनसाठी चंद्रावर वनस्पती उगविणे आवश्यक आहे. हे भविष्यात चंद्रावर मानवी वसती स्थापन करण्यासाठी आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील नॅशनल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर कॅटलिन ब्रिट यांनी सांगितले की, हा शोध पर्यावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या खाद्य सुरक्षेसंबंधीची भीती दूर करण्यासाठीही आवश्यक आहे. चंद्रावरील प्रतिकूल स्थितीत वनस्पती उगविण्याचे तंत्र तयार केल्यास त्याचा वापर करून पृथ्वीवर असलेल्या अनेक आव्हानात्मक परिस्थितीतही आपण अन्नाचे उत्पादन घेऊ शकणार आहे.

Back to top button