अनोखा, आरोग्यदायी ‘मृत समुद्र’! | पुढारी

अनोखा, आरोग्यदायी ‘मृत समुद्र’!

तेल अवीव : इस्रायल व जॉर्डनदरम्यान असलेला ‘मृत समुद्र’ त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. त्याला जरी ‘समुद्र’ म्हटले जात असले तरी वास्तवात त्याचे स्वरूप एखाद्या खारट पाण्याच्या खोल तलावासारखे आहे. हा जगातील सर्वात खोल मिठाचा तलाव आहे. त्याची खोली 304 मीटर आहे. एखाद्या 80 मजली इमारतीइतका तो खोल आहे. या समुद्रात अनेक खनिजे असल्याने त्यामधील स्नान आरोग्यदायी ठरते.

हा समुद्र मोठ्या प्रमाणात जमिनीने वेढलेला आहे. त्याच्या पाण्याचे बाष्पीभवन होते आणि मोठ्या प्रमाणात मीठ साचते. त्याचे पाणी इतके खारट झालं आहे की त्याची घनता कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये बुडू देत नाही. लोक पाण्यावर आरामात तरंगत पडून राहण्याचा आनंद घेतात. समुद्रात पडल्या पडल्या पुस्तके व पेपरही वाचले जातात. मृत समुद्राला मुख्यतः जॉर्डन आणि इतर लहान नद्यांचे पाणी जाते. त्यामध्ये अकरा प्रजातींचे बॅक्टेरिया असतात. याशिवाय मृत समुद्रात मुबलक प्रमाणात खनिजे आढळतात. हे खनिज पदार्थ पर्यावरणासह मिळून आरोग्यासाठी फायदेशीर वातावरण निर्माण करतात. त्याच्या पाण्यापासून बनवलेली सौंदर्य प्रसाधने जगभर प्रसिद्ध आहेत.

Back to top button