कोट्यवधी रुपयांच्या नोटा, सोन्याची मंदिरात सजावट! | पुढारी

कोट्यवधी रुपयांच्या नोटा, सोन्याची मंदिरात सजावट!

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील एका मंदिरात नवरात्रीनिमित्त चक्क कोट्यवधी रुपयांच्या चलनी नोटा व सोन्याची सजावट करण्यात आली होती. वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराच्या प्रबंधन समितीने मंदिराच्या भिंती आणि फरशीवर ही एकूण 8 कोटी रुपयांची सजावट केली होती. त्यामध्ये 3.5 कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि दागदागिन्यांचा समावेश होता.

एक रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांचे बंडल देवीच्या चारही बाजूंनी तसेच छतावरही ठेवले होते. हे मंदिर 135 वर्षे जुने आहे. या नोटा आणि दागिने भक्तांनी दिले होते व उत्सवानंतर ते संबंधित भक्तांना परत दिले जाणार आहेत. या देवीची आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी मंदिरे आहेत.

गेल्यावर्षी नेल्लोर जिल्ह्यातील वासवी कन्यका परमेश्वरी मंदिराला 5.16 कोटी रुपयांच्या चलनी नोटांनी सजवण्यात आले होते. 2000, 500, 200, 100, 50 आणि दहा रुपयांच्या नोटांचे हार व पुष्पगुच्छ बनवून त्यांचाही सजावटीसाठी वापर करण्यात आला. नवरात्रीच्या काळात अनेक भक्त देवीची ‘धनलक्ष्मी’च्या रूपात पूजा करतात. तेलंगणाच्या जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील कन्यका परमेश्वरी मंदिराला यापूर्वी 1,11,11,111 रुपयांच्या चलनी नोटांनी सजवण्यात आले होते. 2017 मध्ये मंदिर समितीने 3,33,33,333 रुपयांच्या चलनी नोटांनी मंदिर सजवले होते.

Back to top button