आदिमानवाची जनुके आजही मानवाच्या शरीरात | पुढारी

आदिमानवाची जनुके आजही मानवाच्या शरीरात

लंडन : यंदाचे नोबेल पुरस्कार विजेते स्वांते पॅएबो यांनी 30 हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या निएंडरथल मानवाच्या जीनोमला डीकोड करण्यात यश मिळवले होते. त्यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनानुसार आधुनिक मानवात या हजारो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या मानवाचे 1 ते 4 टक्के जनुके आजही अस्तित्वात आहेत.

67 वर्षांचे पॅएबो हे एक स्वीडिश नागरिक असून ते गेल्या 25 वर्षांपासून जर्मनीतील लाईपजिग शहरातील ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इवोल्युशनरी अँथ्राेपोलॉजी ’ संस्थेचे संचालक आहेत. जर्मनीच्याच निएंडरथल नावाच्या एक किलोमीटर लांबीच्या दरीतील एका गुहेत सन 1856 मध्ये मानवी कवटी आणि काही अवयवांची हाडे सापडली होती. या प्राचीन लोकांना या दरीचेच नाव देण्यात आले. होमो सेपियन्स, होमो देनीसोवा आणि होमो फ्लोरेसिएन्सिस या मानव प्रजातींप्रमाणेच ही एक वेगळी मानवी प्रजाती होती. पॅएबो यांनी 1997 मध्ये या तीस हजार वर्षांपूर्वीच्या हाडांचे अध्ययन करून या मानवाच्या सर्व जनुकांचे जीनोम डीकोड केले. ही प्रजाती तीस हजार वर्षांपूर्वीपर्यंत युरोप आणि पश्चिम आशियात अस्तित्वात होती.

आधुनिक मानवांचेच एक महत्त्वाचे पूर्वज होमो सेपियन्स व निएंडरथल काही काळ युरेशियन महाद्विपावर एकत्र होते. या काळात दोन्ही प्रजातींच्या जीनोममध्ये मिश्रण झाले. त्यामुळे नव्या पिढीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरही प्रभाव पडला. निएंडरथल मनुष्याची जी जनुके सध्याच्या लोकांच्या जीनोममध्येही आढळतात ती शरीराच्या विभिन्न क्रियांना अनुकूल किंवा प्रतिकूलरीत्या प्रभावित करतात. उदाहरणार्थ, त्यापैकी काही कोव्हिडच्या संक्रमणाच्या धोक्याला कमी करतात तर काही हा धोका वाढवतातही.

Back to top button