रशियन अंतराळवीरासह ‘स्पेस एक्स’चे यान रवाना | पुढारी

रशियन अंतराळवीरासह ‘स्पेस एक्स’चे यान रवाना

केप कॅनाव्हरल : एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’च्या यानाने फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हरलच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. या यानातून एक रशियन अंतराळवीर महिला, दोन अमेरिकन आणि एक जपानी अंतराळवीर रवाना झाले आहेत. वीस वर्षांच्या काळात प्रथमच एखादी रशियन अंतराळवीर व्यक्ती अमेरिकेच्या भूमीवरून अंतराळात गेली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या रशिया आणि अमेरिकेचे संबंध ताणलेले असताना ही घटना घडली आहे हे विशेष!

या चार अंतराळवीरांना घेऊन ‘क्रू ड्रॅगन कॅप्सूल’ रवाना झाले. 23 मजल्यांच्या शक्तिशाली ‘फाल्कन-9’ या रॉकेटच्या सहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. लाँचिंगच्या नऊ मिनिटांनंतर रॉकेटने कॅप्सूलला प्रारंभिक कक्षेत पोहोचवले. चारही अंतराळवीरांसह कॅप्सूल 29 तासांमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल.

या अंतराळ प्रवासाचे नेतृत्व निकोल ओनापू मान (वय 45) ही महिला करीत आहे. ती अमेरिकेच्या हवाई दलातील लढाऊ विमानांची माजी पायलट आहे. तसेच अंतराळ यानाच्या कमांडर सीटवर बसणारी पहिली महिला प्रवासी आहे. रशियाची अंतराळवीर अ‍ॅना किकिना (वय 38) या यानातून रवाना झाली. ती रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’मध्ये आहे.

Back to top button